मांगूर जातीच्या माशांचे खासगी विहिरीतही अस्तित्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:28 IST2021-05-07T04:28:28+5:302021-05-07T04:28:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुक्यातील तलाव, विहीर आदी ठिकाणी जवळपास एक कोटीपेक्षा जास्त मांगूर मासे असावेत, अशी ...

मांगूर जातीच्या माशांचे खासगी विहिरीतही अस्तित्व
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यातील तलाव, विहीर आदी ठिकाणी जवळपास एक कोटीपेक्षा जास्त मांगूर मासे असावेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याबद्दल लोकमतने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर विक्रेते आणि खवय्यांच्यात खळबळ उडाली आहे. काही खासगी विहिरीतही मांगूर जातीच्या विषारी माशांचे अस्तित्व आहेत. मांगूर मासा खाणे आरोग्यासाठी हानिकारक असल्यानंतरही मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
करमाळे, पाडळी, शिवणी तलाव आणि आता मोरणा धरणामध्ये आले आहेत.
फिरते काही मासेविक्रेते याचा व्यवसाय करत आहेत. मरळ मासा असलेच्या सांगून याची विक्री केली जात आहे. त्याचबरोबर हा मासा पाण्याबाहेरही दोन दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे खवय्यांना ताजा व जिवंत मासा मिळत असल्याने नागरिकही यास फसत आहेत. मरळ माश्याला खवले असतात तो पाण्याविना जगू शकत नाही. मात्र, मांगूर माश्याला खवले नसतात व तो पाण्याशिवाय दोन दिवस जगू शकतो.
हा मासा खाल्ल्यावर कर्करोगासारखे रोग होतात, जीवितास धोका निर्माण होतो. यामुळे या माश्याच्या विक्रीवर बंदी आहे. याचबरोबर हा मासा मांसाहारी असल्याने इतर माश्याना खातो. डोक्याचा, मिश्या असलेला हा मासा, डबक्यात, चिखलात, गटारात जगू शकतो. मासा पाण्याव्यतिरिक्तही राहू शकतो. एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत मांगूरची लांबी असते. मानेजवळ काटे असतात. त्याची विचित्र सवय आहे, तो काहीही खातो. त्याचे मांस चरबीयुक्त असते आणि त्यात बॅक्टेरियाही असतात. हा मासा आरोग्यासाठी हानिकारक असून स्थानिकांना याबद्दल फारशी माहिती नसल्याने लोक हा मासा मोठ्या संख्येने घरी घेऊन जात आहेत.
चौकट
सदर मासा आढळून आल्यास तो नष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी गावातील काही पंचासमक्ष हे मासे मीठ घालून जमिनीत पुरणे ही प्रक्रिया आहे. याबाबत मत्स्य विभाग नक्की काय करणार? नागरिकांना सहकार्य करणार की एखादी विपरीत घडल्यावर जागे होणार? असा नागरिकांमधून सवाल उपस्थित होत आहे.