औरंगजेबला जन्माचा धडा शिकवणारी ‘माणगंगा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:26 IST2021-04-04T04:26:30+5:302021-04-04T04:26:30+5:30
माणदेशाचे संदर्भ थेट राष्ट्रकुट काळापर्यंत जातात. इसवीसनाच्या पाचव्या शतकात येथे राष्ट्रकुट राजे राज्य करत हाेते. मानांक हा या साम्राज्याचा ...

औरंगजेबला जन्माचा धडा शिकवणारी ‘माणगंगा’
माणदेशाचे संदर्भ थेट राष्ट्रकुट काळापर्यंत जातात. इसवीसनाच्या पाचव्या शतकात येथे राष्ट्रकुट राजे राज्य करत हाेते. मानांक हा या साम्राज्याचा मूळपुरुष. त्याच्या नावावरून या प्रदेशाला माणदेश तसेच या प्रदेशातून वाहणाऱ्या नदीला माणगंगा असे नाव पडले. माणगंगा ही भीमा नदीची उपनदी. सातारा जिल्ह्यातील दहिवाडीजवळ कुळकजाई येथे सीतामाईच्या डोंगररांगामध्ये ती उगम पावते. तिथे सीतामाईचे मंदिर आहे. शिवाय, जवळच बाणगंगा नदीचाही उगम होतो. येथून माण नदी जमिनीत लुप्त होते. ती पुन्हा डोंगराच्या दुसऱ्या बाजूला उमाळ्याच्या स्वरूपात उगम पावते. तेथून पुढे मात्र अखंड ८ कि.मी. अंतरावरील आंधळी धरणापर्यंत ओघळ स्वरूपात वाहते. १५१ किलाेमीटर लांबीची ही नदी साेलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यानजीक सरकोळीजवळ भीमा नदीस जाऊन मिळते. उगमापासून म्हणजे कुळकजाई ते सरकोळी येथे भीमा नदीच्या संगमापर्यंत माणगंगेला एकूण बेचाळीस लहान-मोठे ओहोळ, ओढे आणि उपनद्या मिळतात.
कायम दुष्काळी असलेल्या माणदेशातून वाहणारी माणगंगा बारमाही काेरडीच दिसते. माणदेशाच्या भूमीचे वैशिष्ट्य म्हणजे, इथली माती. ही माती माण माती या नावानेच प्रसिद्ध आहे. माणदेशातील सर्व ओढे किंवा माणगंगा नदी ही वर्षातून १० ते ११ महिने कोरडीच असते. परंतु, नदीकाठच्या किंवा ओढ्याकाठच्या ५०० फुटांहून अधिक भागातील विहिरींना उन्हाळ्यातसुद्धा पाणी असते.
शिवकाळातील माणगंगेच्या एका अनाेख्या पराक्रमामुळे मुघल सम्राट औरंगजेबला चांगलाच धडा मिळाला हाेता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य संपविण्यासाठी महाराष्ट्रात उतरलेल्या औरंगजेबचा १६९८ ते १७०३ या कालावधीत शंभू महादेवाच्या डाेंगररांगांमध्येच मुक्काम हाेता. सन १७०० च्या सप्टेंबरमध्ये ताे दुष्काळी टापूत बारमाही काेरड्या सध्याच्या सांगाेला तालुक्यातील खवासपूर येथे त्याचा तळ हाेता. १ ऑक्टाेबर राेजी अचानक परतीचा पाऊस झाला आणि काेरडी माणगंगा अक्षरश: दुथडी भरून वाहू लागली. नदीपात्रातील औरंगजेबचे शामियाने, फाैजफाटा, खजिना अक्षरश: वाहून गेला. महापुरातून सुटका करून घेताना या मुघल सम्राटाचा पाय माेडला. पुढे आयुष्यभर औरंगजेब लंगडत चालत हाेता.
नंतरच्या काळात ब्रिटिशांनी राजेवाडी येथे तलाव निर्माण केला. बारमाही काेरडी असली तरी माणगंगेच्या पात्रामध्ये मुबलक प्रमाणात वाळू आहे. माणगंगेला बारमाही वाहती करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेचे प्रयाेग झाले. सध्या लोकवर्गणी आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून माणगंगा पात्राच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे.
- दत्तात्रय शिंदे