मालगावच्या ‘जयहिंद’चा कारभार अखेर संचालक मंडळाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:59+5:302021-03-13T04:48:59+5:30
जयहिंद सोसायटीत १३ संचालक आहेत. चार संचालकांचे राजीनामे मंजूर आहेत. सध्या नऊ संचालकांवर कारभार सुरू आहे. ...

मालगावच्या ‘जयहिंद’चा कारभार अखेर संचालक मंडळाकडे
जयहिंद सोसायटीत १३ संचालक आहेत. चार संचालकांचे राजीनामे मंजूर आहेत. सध्या नऊ संचालकांवर कारभार सुरू आहे. गैरव्यवहारासह इतर चुकीचा कारभार झाल्याची तक्रार सदानंद कबाडगेंसह इतर सभासदांनी मिरजेच्या उपनिबंधकांकडे केली होती. तिची दखल घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर उपनिबंधकांनी संचालक मंडळ बरखास्त करून दि. २९ डिसेंबर रोजी प्रशासक म्हणून जिल्हा बँकेचे अधिकारी विष्णू जाधव यांची नियुक्ती केली होती. या आदेशाला अध्यक्षा प्रभावती पाटील, उपाध्यक्ष चिदानंद घुळी यांनी कोल्हापूर येथील सहकार संस्थेच्या सहनिबंधकांकडे अपील दाखल करीत आव्हान दिले होते. सहनिबंधकांनी लेखी व तोंडी म्हणणे समजून घेत उपनिबंधकांचा आदेश फेटाळून लावला. संचालक मंडळ बरखास्तीचा व प्रशासक नियुक्तीचा आदेश रद्द करण्याबरोबर कारभार पूर्ववत संचालक मंडळाकडे ठेवण्याचा निर्णय दिला आहे.
या आदेशानुसार अध्यक्ष व सचिवांनी संस्थेचे कामकाज हाती घेतले आहे. संचालकांना मुदतवाढ मिळाली आहे. जूनमध्ये निवडणुकीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने पुन्हा संस्थेवर ताबा मिळवून विरोधकांना धक्का दिला आहे.
चौकट
बदनाम करण्याचा प्रयत्न : विजय आवटी
सहनिबंधकांनी सोसायटीवरील प्रशासक रद्द करून संस्थेचा कारभार संचालक मंडळाकडे देण्याचा आदेश दिला आहे. कोणताही गैरकारभार नसल्याचे या आदेशाने सिद्ध झाले आहे. केवळ राजकीय हेतूने विरोधकांकडून संस्थेला बदनाम केले जात असल्याचा आरोप संचालक विजय आवटी यांनी केला.