मानसिंगराव नाईक यांना घरातूनच विरोध
By Admin | Updated: October 6, 2015 23:52 IST2015-10-06T23:00:42+5:302015-10-06T23:52:41+5:30
‘विश्वास’चे खासगीकरण : हंबीरराव, उदयसिंह, रणजितसिंहांचा न्यायालयीन, रस्त्यावरील लढाईचा इशारा

मानसिंगराव नाईक यांना घरातूनच विरोध
सांगली : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक साखर कारखाना खासगीकरणाचा ठराव कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मानसिंगराव (भाऊ) नाईक यांनी केला होता. त्यांच्या या ठरावाविरोधात मानसिंगभाऊंच्या घरातीलच संचालक हंबीरराव नाईक, रणजितसिंह नाईक, उदयसिंह नाईक यांनी मंगळवारी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन कडाडून विरोध केला आहे. कारखाना सभासदांच्या मालकीचाच ठेवण्यासाठी न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाई लढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे विश्वासराव नाईक कारखान्याच्या खासगीकरणावरून नाईक कुटुंबात फूट पडल्याचे दिसत आहे.
हंबीरराव नाईक, उदयसिंह नाईक, रणजितसिंह नाईक, शोभाताई दिलीपराव नाईक, अभिजित नाईक यांनी सांगलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, शिराळा तालुक्यातील नाटोली आणि चिखली येथील सभासदांनी पैसे न घेता १४० एकर जागा कारखान्यास दिली आहे. शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून विश्वासराव नाईक यांनी सभासदांना बरोबर घेऊन विश्वासराव नाईक साखर कारखान्याची उभारणी केली आहे. या कारखान्यासाठी स्वत: विश्वासराव नाईक यांच्यासह तिघांचे बलिदान गेले आहे. म्हणून हा कारखाना सभासदांच्या मालकीचाच राहिला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत कारखान्याचे खासगीकरण करू देणार नाही. कारखाना खासगीकरण करण्याचे नक्की कारण काय, हेही आम्हाला कळाले नाही. खासगीकरणाचा ठराव मांडण्यापूर्वी कारखान्याच्या बोर्ड मिटिंगसमोर येण्याची गरज होती.
सर्वसाधारण सभेत ठराव त्यांना मांडायचाच होता, तर तो रितसर विषयपत्रिकेवर का घेतला नाही. एवढा महत्त्वाचा ठराव सभा संपताना अध्यक्षांचे भाषण झाल्यानंतर आणि अनेक सभासद उठून गेल्यानंतर का मांडला?, असा प्रश्न आमच्यासह हजारो सभासदांना व कामगारांना पडला आहे. शिवाय, ज्यांनी ठरावास अनुमोदन दिले आहे, ते कारखान्यास ऊसही घालत नाहीत. कारखान्याच्या बहुतांशी संचालक आणि उपाध्यक्षांनाही खासगीकरणाची कोणतीच कल्पना दिली नाही. शंभर टक्के खासगीकरणाचा ठराव बेकायदेशीर आहे. एकाही सभासद व कामगाराला हा ठराव मान्य नसून, त्यांनी तीव्र विरोध केला आहे. खासगीकरणाचा ठराव मंजूर केल्यानंतर एक मिनिटसुध्दा सभा चालली नाही.
या सर्व प्रश्नांवर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगरावभाऊ यांच्याशी चर्चा करायची म्हटले तर, ते परदेशी गेले आहेत. ते कारखाना सहकारात ठेवण्यासाठी फारसे उत्सुक नसल्यामुळेच आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत. आमचा व्यक्तीला विरोध नसून, कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, एवढीच आमची इच्छा आहे. त्यांनी सभासदांचे हित लक्षात घेऊन कारखाना सहकारात ठेवल्यास त्यास आमची काहीच हरकत नाही. पण, ते खासगीकरणावर ठाम असतील, तर सर्वपक्षीय कार्यकर्ते, राज्यकर्ते, सभासद, कामगारांना एकत्रित करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याचबरोबरच शासनदरबारी आणि न्यायालयीन लढाईही लढणार असल्याचा इशारा नाईक यांनी दिला. (प्रतिनिधी)
‘त्यांना’ही बरोबर घेऊ
विश्वासराव नाईक कारखाना वाचविण्यासाठी, शासनदरबारी दाद मागण्यासाठी आमदार शिवाजीराव नाईक यांची आम्ही निश्चित मदत घेणार आहे. शिवाय, माजी सभापती शिवाजीराव देशमुख हे तर कारखान्याचे सभासद आहेत. यामुळे कारखाना सभासदांचा राहण्यासाठी निश्चितच ते आमच्याबरोबर येतील. विश्वासराव नाईक कारखाना वाचविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना आम्ही बरोबर घेऊन रस्त्यावरील लढाई लढणार आहे. या लढाईत कामगारही आमच्याबरोबर असल्याचे रणजितसिंह नाईक व उदयसिंह नाईक यांनी सांगितले.
खासगीकरण म्हणजे भाऊ, आप्पांच्या धोरणाचा विश्वासघात
कारखान्याचे संस्थापक विश्वासराव नाईक (भाऊ) आणि लोकनेते फत्तेसिंगराव नाईक (आप्पा) यांनी सभासद आणि शेतकऱ्यांचे हित पाहून यशवंतराव चव्हाण यांच्याकडून कारखान्यासाठी परवाना मिळविला होता. हे सहकाराचे मंदिर त्यांनी उभे केले होते. ते बंद करून त्याचे खासगीकरण करणे म्हणजे भाऊ आणि आप्पांच्या धोरणाचा विश्वासघात केल्यासारखे आहे, अशी टीका विश्वासराव नाईक यांचे नातू रणजितसिंह नाईक यांनी केली आहे.
नाईक कुटुंबांचे नातेसंबंध
विश्वासराव नाईक कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या कारखाना खासगीकरणाच्या मुद्द्याला विरोध करणारे कारखान्याचे संचालक रणजितसिंह नाईक व अभिजित नाईक हे मानसिंगभाऊंचे चुलत भाऊ आहेत. तसेच विश्वासराव नाईक यांचे नातू आहेत. शिवाय, हंबीरराव नाईक व उदयसिंह नाईक हे चुलते आहेत. शोभाताई दिलीपराव नाईक या चुलती आहेत. या सर्वांनीच मानसिंगभाऊंच्या कारखाना खासगीकरणास तीव्र विरोध केला आहे.