लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळांना लागलेली सुटी आणि त्यामुळे ‘घरकोंबडा’ झालेल्या मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या अधिक तीव्रपणे जाणवत आहे. ग्रामीण भागात कुपोषण व तीव्र कुपोषणाचे प्रमाण अद्यापही असले तरी शहरात मात्र, मुलांचे वजन वाढताना दिसत आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या नवीन समस्यांना पालकांना तोंड द्यावे लागत आहे.
शाळा सुरू असल्यानंतर मुलांच्या हालचाली होत असतात. मात्र, सध्या पूर्ण शाळा बंद असल्याने घराबाहेर पडणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी आहे. त्यात कोरोना संसर्गाची भीती असल्याने पालकांकडूनही मुलांची काळजी घेताना, त्यांना मैदानावर जास्त सोडले जात नाही. घरात बसून असल्याने फास्ट फूड खाण्याचेही प्रमाण वाढल्यानेही कुपोषणाची नवीन समस्या समोर येत आहे.
चौकट
स्थूलता ही नवीन समस्याच
ग्रामीण भागात शाळा बंद असल्यातरी मुले शेतात किंवा गावात फिरून क्रयशक्ती कायम ठेवतात. मात्र, त्याच्या उलट शहरातील मुले घराबाहेर पडत नसल्याने त्यांच्यात वजनवाढीची समस्या जाणवत आहे. त्यामुळे शहरात स्थूलताही नवीन समस्या मुलांमध्ये जाणवत आहे.
कारणे काय?
१) हालचाल मंदावल्याने मुलांना घरात टीव्हीसमोर बसून वेळ काढावा लागतो. शिवाय ऑनलाईन शिक्षणामुळेही मुलांमध्ये हालचाल खूपच कमी झाली आहे.
२) दीड वर्षापासून घरातच असलेल्या मुलांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीत मोठा बदल झाला आहे. बाहेरचे चमचमीत खाण्यावर मर्यादा आल्याने अनेकदा घरातच असे पदार्थ वारंवार बनवले जात असून, त्यामुळे मुलांमध्ये स्थूलता वाढत आहे.
३) मुलांचे केवळ ऑनलाईन शिक्षण व त्यानंतरचा वेळ मोबाईल, टीव्हीमध्ये जात असल्याने एकलकोंडे बनलेल्या मुलांत आरोग्यविषयक जनजागृती कमी झाल्यानेही समस्या जाणवत आहे.
चौकट
षडरस आहारच योग्य
सध्या मुलांसह कुटुंबातील प्रत्येकाच्या आहारात प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा समावेश अधिक आहे. पाेषणमूल्ये कमी होऊन मुलांमधील वजन वाढत आहे. त्यामुळे आहारात षडरस असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तिखट, आंबट, गोड, कडू, तुरट आणि खारट असे सर्व चवीचे पदार्थ जेवणात असल्यास कुपोषण टळणार आहे.
चौकट
तज्ज्ञ काय म्हणतात
कोट
पोषणमूल्यांनी भरपूर आहार असल्यास कुपोषण जाणवणार नाही. यासाठी पारंपरिक पद्धतीच्या जेवणावर भर द्यावा. कॅलरीज आणि प्रोटिनच्या मागे न लागता वरण, भात, चटणी, कोशिंबीर आदी पदार्थांतूनही तीच पोषकतत्त्वे मिळत असल्याने आहार कायम ठेवल्यास मुलांना कोणतीच समस्या जाणवणार नाही.
डॉ. योगेश माईनकर, आयुर्वेदिक तज्ज्ञ