मालगावात पोलिसांची तरुणांना बेदम मारहाण
By Admin | Updated: July 31, 2015 01:14 IST2015-07-31T01:09:52+5:302015-07-31T01:14:20+5:30
पाठीवर वळ : समाजमंदिरात तोडफोडीच्या तक्रारीनंतर चोप

मालगावात पोलिसांची तरुणांना बेदम मारहाण
मिरज : मालगाव (ता. मिरज) येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून समाजमंदिराची मोडतोड करण्यात आली. याप्रकरणी तक्रारीनंतर ग्रामीण पोलिसांनी बुधवारी रात्री रोहन प्रताप खांडेकर (वय २०) व चंद्रकांत बाबू नंदीवाले (१९, रा. दोघे मालगाव) या दोन युवकांना चौकात कपडे काढून बेदम मारहाण केली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
मालगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सोमवारी सत्तांतर झाल्यानंतर हुळ्ळे गटाचा समर्थक तुषार खांडेकर याने जल्लोष केला. या रागातून रोहन खांडेकर व चंद्रकांत नंदीवाले या दोघांनी समाजमंदिराची मोडतोड केल्याची तक्रार तुषार खांडेकर याने ग्रामीण पोलिसांत दिली. तक्रारीनंतर बुधवारी रात्री ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रोहन खांडेकर व चंद्रकांत नंदीवाले या युवकांना पकडून मालगावातील सिध्दार्थ चौकात आणले. दोघांचे शर्ट काढून पोलिसांनी त्यांना चौकातच काठीने मारहाण केली. पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे दोघांच्या पाठीवर, हाता-पायावर काठीचे वळ उठले आहेत. खांडेकर व नंदीवाले यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, समाजमंदिराची तोडफोड करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल खांडेकर व नंदीवाले यांच्यावर जरब बसेल इतपत कारवाई करण्यात आली. अमानुष मारहाणीची तक्रार खोटी आहे. एका संशयितास त्वचाविकार असल्याने त्याची पाठ लाल झाल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)