अज्ञात वाहनाच्या धडकेत मळणगावचा जवान ठार
By Admin | Updated: August 28, 2016 00:19 IST2016-08-28T00:19:40+5:302016-08-28T00:19:40+5:30
भोसले हे भारतीय सैन्यदलात जवान

अज्ञात वाहनाच्या धडकेत मळणगावचा जवान ठार
देशिंग : मिरज-पंढरपूर राज्य मार्गावर कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील शेरी पुलाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सुधाकर बाबासाहेब भोसले (वय ३०, रा. मळणगाव) हे जागीच ठार झाले. भोसले हे भारतीय सैन्यदलात जवान होते. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री घडला .
सुधाकर भोसले हे २००६ मध्ये सैन्यात भरती झाले होते. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ते वीस दिवसांच्या सुटीवर मळणगाव येथे आले होते. तर सुटी संपत आल्याने ते पुन्हा जाण्याच्या तयारीत होते. माहेरी गेलेल्या पत्नीस मळणगावला घेऊन येण्यासाठी ते मदभावी (ता. अथणी) येथे दुचाकीवरून (एमएच १४ सीई ८५९६) निघाले होते. कुची येथील शेरी पुलावर त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मध्यरात्री कवठेमहांकाळ पोलिसांच्या गस्त पथकास ते मृतावस्थेत रस्त्यावर पडलेले दिसून आले. मळणगाव गावातील व्यवहार बंद ठेवून शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन वसमळे करीत
आहेत. (वार्ताहर)