विठ्ठलवाडीत महामार्गावर भुयारी मार्ग बनवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST2021-02-15T04:24:15+5:302021-02-15T04:24:15+5:30
सध्या रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ चे काम सुरू आहे. परंतु, या मार्गावरील विठ्ठलवाडी परिसरात ग्रामस्थांच्या उड्डाणपूल अथवा ...

विठ्ठलवाडीत महामार्गावर भुयारी मार्ग बनवा
सध्या रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ चे काम सुरू आहे. परंतु, या मार्गावरील विठ्ठलवाडी परिसरात ग्रामस्थांच्या उड्डाणपूल अथवा भुयारी मार्गाच्या मागणी अर्जाला मात्र वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी व शासन दरबारी रीतसर मागणी करूनही त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.
विठ्ठलवाडीजवळ सुमारे १५ ते २० फूट भराव घालून रस्त्याची उंची वाढविण्यात आली आहे.
एकतर या रस्त्याच्या एका बाजूला गाव, शाळा, तर दुसऱ्या बाजूला या गावातील जवळजवळ ऐंशी टक्के शेती व वस्त्या आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी मोठी वर्दळ असते. त्यामध्ये वृद्ध व शाळकरी मुलांचाही समावेश असतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांची जनावरेही या मार्गावरूनच न्यावी लागतात. त्यामुळे हा रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून ओलांडावा लागतो, हे मोठे धोकादायक ठरत आहे. तेव्हा संभाव्य धोका लक्षात घेऊन तत्काळ या ठिकाणी भुयारी मार्गाची व्यवस्था करा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मल्लुदेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किसनराव टोणे यांनी दिला.
यावेळी रामचंद्र बजबळकर,जगन्नाथ धायगुडे, विष्णू टोणे, शहाजी घेरडे, तुकाराम टेंगले, अशोक टोणे, पांडुरंग बजबलकर, शहाजी टोणे, गोरख पवार, बाबू टोणे, आदी उपस्थित होते.