पालिकेस करा पैशाची मदत!
By Admin | Updated: June 11, 2015 00:26 IST2015-06-10T23:04:05+5:302015-06-11T00:26:13+5:30
निधीसाठी फलक : मिरजेत नागरिक त्रस्त

पालिकेस करा पैशाची मदत!
मिरज : रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने मिरजेतील त्रस्त नागरिकांनी मंगळवार पेठेतील चर्च रस्त्यावर खड्ड्यात झाडाची फांदी लावून, ‘महापालिकेस पैशाची मदत करा’, असा उपरोधिक फलक लावला आहे.
महापालिकेकडे निधी नसल्याने प्रमुख रस्त्यांचे काम रखडले आहे. शहरातील चर्च रोड, गांधी चौक ते शिवाजी चौक, गणेश तलाव ते मार्केट, हिरा हॉटेल ते शहर पोलीस ठाण्यापर्यंतच्या या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणत खड्डे पडल्याने यातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था असताना, पावसाळा तोंडावर आल्याने नागरिक हैरण आहेत. रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आराखडा तयार आहे. मात्र निधीअभावीअद्याप रुंदीकरण रखडले आहे. या प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत.
खराब रस्त्यांच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त असताना, महापालिकेचे मात्र दुर्लक्ष आहे. शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने महापालिकेने रस्त्यांचे रुंदीकरण, खड्डे भरणे व डांबरीकरण करुन खराब रस्त्यांचा प्रश्न निकाली काढणे आवश्यक आहे. चर्च रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने येथे वाहनधारकांची कसरत सुरु आहे. त्यातच ड्रेनेजचे झाकण तुटल्याने ड्रेनेज चेंबरमध्ये दुचाकी वाहन अडकून वाहनधारक जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रार केल्यानंतरही महापालिका प्रशासनाने ड्रेनेजचे चेंबर बंद केलेले नाही. यामुळे नागरिकांनी फलक लावला होता.
दिवसभर या फलकाची चर्चा सुरु होती. मात्र महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नसल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. (वार्ताहर)