मिरजेत महापौरांची सवाद्य करवसुली

By Admin | Updated: March 24, 2015 00:12 IST2015-03-24T00:07:31+5:302015-03-24T00:12:25+5:30

एलबीटीचा प्रश्न : मालमत्ता विभागाच्या वसुलीसाठीही ढोल-ताशे; पाच लाख रुपये कर संकलन

Major Tax Recovery of the Mayor | मिरजेत महापौरांची सवाद्य करवसुली

मिरजेत महापौरांची सवाद्य करवसुली

मिरज : महापौर विवेक कांबळे यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मिरजेत आज (सोमवारी) ढोल-ताशांच्या गजरात एलबीटी व मालमत्ता कराची वसुली केली. व्यापाऱ्यांच्या विरोधाला न जुमानता महापौरांनी आक्रमक पवित्रा घेत पाच लाखाची कर वसुली केली. सांगलीनंतर आज मिरजेत हायस्कूल रोड, माधव टॉकीज रोड, लक्ष्मी मार्केट परिसरातील व्यापाऱ्यांच्या दारात ढोल-ताशे वाजविण्यात आले. महापौर विवेक कांबळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांकडे जाऊन गुलाबपुष्प देत एलबीटी व मालमत्ता कर भरण्याचे त्यांना आवाहन केले. काही व्यापाऱ्यांनी एलबीटी व मालमत्ता कर भरल्याने महापौरांच्या या मोहिमेत ९० हजार एलबीटी, सुमारे चार लाख रूपये मालमत्ता कर व घरपट्टीची वसुली झाली. महापौरांच्या वसुली मोहिमेमुळे मोठी गर्दी जमली होती. व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या दारातही ढोल-ताशे वाजविण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात पाच लाख रूपये कर वसुली झाल्याचे सांगण्यात आले.
माधव टॉकीज रोड परिसरात व्यापाऱ्यांनी रस्त्यावर ठेवलेले साहित्य महापौरांनी हटविण्याचे आदेश दिले. महापौरांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास भाग पाडल्याने व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. (वार्ताहर)


महापौरांना धमकीचे निनावी पत्र
‘व्यापाऱ्यांना त्रास द्याल, तर तुम्हाला बघून घेईन. तुम्ही अडचणीत याल’, अशा आशयाचे धमकीचे निनावी पत्र आज, सोमवारी महापौर विवेक कांबळे यांना आले. त्यामुळे महापालिकेत खळबळ माजली. कांबळे यांनी अशा पत्रांची मी दखल घेत नाही, असे सांगून ते पत्र रेकॉर्डला ठेवून दिले.
पोस्टकार्डवर हा धमकीचा मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यावर सांगलीतील पोस्टाचा शिक्का असल्याने हे पत्र सांगलीतूनच लिहिले गेल्याचे स्पष्ट झाले. सध्या एलबीटीच्या प्रश्नावरून महापौर विवेक कांबळे आणि एलबीटीविरोधी कृती समितीमध्ये संघर्ष सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर धमकीचे हे पत्र आल्याने महापालिकेत खळबळ माजली आहे.
व्यापाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा उल्लेख या पत्रात आहे. त्यामुळे एलबीटीप्रश्नी सुरू असलेल्या कारवाईचे धागेदोरे याला जोडले जात आहेत. महापौरांनी पत्र वाचून ते स्वीय सहायकांकडे रेकॉर्डला ठेवण्यासाठी दिले. अशा पत्रांची दखल आपण कधीच घेणार नाही, असे सांगत त्यांनी तक्रार दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला.
महापौरांना दिलेल्या धमकीच्या या पत्रामुळे महापालिकेत खळबळ माजली आहे. याविषयीची उलटसुलट चर्चा आता महापालिका कार्यालयात रंगली आहे.

Web Title: Major Tax Recovery of the Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.