सीमाभागात मका, उसाचे क्षेत्र वाढले
By Admin | Updated: September 11, 2014 23:05 IST2014-09-11T22:32:56+5:302014-09-11T23:05:34+5:30
पावसाची कृपा : मिरज पूर्व भागामधील चित्र

सीमाभागात मका, उसाचे क्षेत्र वाढले
प्रवीण जगताप - लिंगनूर -गणपती बाप्पा पाऊस घेऊन आले अन् कोरडवाहू असणाऱ्या सीमाभागातील मका व ऊसशेती बहरली आहे. पाण्याची कमतरता असणाऱ्या व सीमाभागातील लक्ष्मीवाडी, खटाव, संतोषवाडी, जानराववाडी, चाबूकस्वारवाडी व सलगरे परिसरातील मका पिकास गणेशोत्सवादरम्यान झालेला पाऊस पिकाला पोषक आहे. समतल शेतीक्षेत्र वगळता उर्वरित मका उत्पादकांना हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. ‘पावले बाप्पा, अन् बहरला ऊस-मका’ असे चित्र सीमाभागातील महाराष्ट्र व कर्नाटकातील गावांत निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांनी जूनच्या अखेरीस, तर उर्वरित छोट्या शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात मका पेरणी केली होती. त्यानंतर पावसाने पंधरा दिवस उघडीप दिली होती. त्यामुळे उत्पादक चिंतेत होते; मात्र पुन्हा पावसाच्या काही सरी कोसळल्या आणि मागील आठ दिवसांत पावसाने विक्रमी नोंद केली. यामुळे मका पीक सध्या बहरले आहे. कणसे तयार होत आहेत. पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने समतल भागातील मका व ऊस पिकास फटका बसला आहे. मात्र उर्वरित क्षेत्रात पुन्हा चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने ऊसशेतीस हा पाऊस पोषकच ठरत आहे. जानेवारीदरम्यान लावण केलेल्या उसाच्या वाढीस हा पाऊस उपयुक्त ठरत आहे; मात्र लिंगनूर परिसरात अनेकांच्या ऊसशेतीत पाणी अद्याप हटले नसल्याने त्याचा उताऱ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मका पिकास क्ंिवटलला एक हजार २०० रुपये भाव मिळाला; पण व्यापाऱ्यांच्या धोरणामुळे हा दर एक हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे उत्पादन चांगले येऊन सुद्धा दराची ‘हमी’ मिळत नसल्याने मका उत्पादनात दरवर्षी घट होत आहे. ऊसाला २२०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. त्रास कमी तुलनेत उसाच्या दराची खात्री मिळू लागल्याने ऊसशेतीकडे दुष्काळी भागातील शेतकरी वळू लागला आहे.