फोटो ओळ : मिरजेत ओबीसी आरक्षणप्रश्नी किरण बंडगर यांनी सभापती अनिल आमटवणे व गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर यांना मागणीचे निवेदन दिले.
मिरज : राज्यात ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ व रद्द केलेले आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी टाकळीचे पंचायत समिती सदस्य किरण बंडगर यांनी डिजिटल बॅनर परिधान करून सभागृहात प्रवेश करून मिरज पंचायत समितीच्या सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांनी मागणीचे निवेदन देत ओबीसी आरक्षण लागू करण्याच्या ठरावाची मागणी केली.
मिरज पंचायत समितीची शुक्रवारी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे मासिक सभा पार पडली. सभा सुरू असताना किरण बंडगर यांनी ओबीसी आरक्षणप्रश्नी राज्य शासनाच्या निषेधार्थ व आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी अंगावर बॅनर परिधान करून प्रवेश करीत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी सभेत सभापती अनिल आमटवणे व गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर यांना मागणीचे निवेदन दिले.
शासनाने ओबीसींच्या आरक्षणासाठी न्यायालयाकडे पाठपुरावा करून न्याय द्यावा, आरक्षण लागू होईपर्यंत कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत या मागणीच्या ठरावाची बंडगर यांनी सभेत मागणी केली. मराठा व ओबीसींचे रद्द झालेल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने
पाठपुरावा करण्याची मागणी करीत विक्रम पाटील, अशोक मोहिते यांनी बंडगर यांच्या मागणीला पाठिंबा दिला.