ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी २७ रोजी जनमोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST2021-02-08T04:23:51+5:302021-02-08T04:23:51+5:30
कामेरी : सांगली येथील क्रांतीभूमीत २७ फेब्रुवारी रोजी ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी काढण्यात येणाऱ्या जनमोर्चा व मेळाव्यासाठी ...

ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी २७ रोजी जनमोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा
कामेरी : सांगली येथील क्रांतीभूमीत २७ फेब्रुवारी रोजी ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी काढण्यात येणाऱ्या जनमोर्चा व मेळाव्यासाठी लाखो संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ओबीसी संघटनेचे राज्य नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी कामेरी येथे केले. ते कामेरी (ता. वाळवा) येथे वाळवा व शिराळा तालुक्यातील बारा बलुतेदार व आलुतेदार मेळाव्यात बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव निळकंठ होते.
शेडगे म्हणाले, ओबीसी जनमोर्चाची भूमिका अशी आहे की, जो गायकवाड आयोग आहे तो देशाच्या घटनेवरच घातलेला घाला आहे. हा पूर्णपणे संशयास्पद असून हा मागासवर्गीय आयोग असताना यात मात्र सर्व ओपन कॅटेगरीचे आहेत. तरी हा अहवाल जनतेसमोर ओपन करावा. ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही, अशी आमची भूमिका आहे. या वेळी बोलताना शिवाजीराव निळकंठ म्हणाले, सरकारने गेली अनेक वर्षे जातनिहाय आरक्षण जाहीर केलेले नाही. अनेक वर्षे आपल्यावर अन्याय होत आला आहे तरी हा अन्याय रोखण्यासाठी आपण सर्व संघटित व्हायला हवे.
या वेळी सांगली जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती जगन्नाथ माळी व विषय संघटनेचे प्रदीप वाले गुरव समाजाचे सुनील गुरव, दत्तात्रय घाडगे, गौतम लोटे, साधना राठोड, कलाकार महासंघाचे राज्याध्यक्ष अनिल बोडरे, प्रेमलाताई माळी, रंजना माळी, दत्तात्रय घाडगे यांची भाषणे झाली. या वेळी युवा नेते दीपक गुरव, सागर मलगुंडे, सांगली जिल्हा शिवसेनाप्रमुख नंदकुमार निळकंठ, अशोक निळकंठ, जयवंत अजमाने, मोहन अजमाने, शांताराम देशमाने, धनपाल माळी आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत युवानेते दीपक निळकंठ यांनी केले. नंदकुमार निळकंठ यांनी आभार मानले.