कोरोनाकाळात वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:40+5:302021-06-18T04:18:40+5:30
मिरज : कोरोनाकाळात आरोग्य विभागात वैद्यकीय सेवेत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी मिरजेतील अहमद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ...

कोरोनाकाळात वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा
मिरज : कोरोनाकाळात आरोग्य विभागात वैद्यकीय सेवेत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी मिरजेतील अहमद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना साथीदरम्यान अत्यावश्यक सेवा म्हणून महापालिका आरोग्य विभागाने वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कर्मचारी, आरोग्यसेविका, सेवक, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, एक्स-रे टेक्निशियन इत्यादींना आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत सेवेत समाविष्ट करून घेतले आहे. महापालिकेने सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवेसाठी त्यांची नियुक्त केली होती. त्यांनी कोविड साथीदरम्यान स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आरोग्यसेवक म्हणून काम केले आहे. कोरोना साथ संपल्यानंतर त्यांना सेवेतून कमी न करता त्यांच्या कामाची दखल घेऊन आरोग्य विभागाच्या वैद्यकीय सेवेत सामावून घेऊन त्यांना न्याय द्यावा. यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान होऊन भविष्यात त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल. या मागणीबाबत महापालिकेने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी अहमद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मुस्तफा बुजरुक यांनी केली आहे.