अग्रणी नदी पुनरुज्जीवनासाठी विशेष निधी देणार
By Admin | Updated: October 1, 2015 23:16 IST2015-10-01T23:16:14+5:302015-10-01T23:16:14+5:30
प्रभाकर देशमुख : विट्यात नियोजन बैठक; राज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी

अग्रणी नदी पुनरुज्जीवनासाठी विशेष निधी देणार
विटा : दुष्काळी खानापूर, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यात सुरू असलेले अग्रणी नदी पुनरुज्जीवनाचे काम अत्यंत चांगले झाले असून, ते राज्यात एक आदर्श मॉडेल व पायलट प्रोजेक्ट म्हणून नावारूपास येईल असे सांगून, अग्रणी पुनरुज्जीवन कामासाठी शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे मदत, पुनर्वसन, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख यांनी दिली.विटा येथे अग्रणी नदी पुनरुज्जीवन कामाच्या पाहणीनंतर आयोजित केलेल्या नियोजन बैठकीत सचिव देशमुख बोलत होते. यावेळी आ. अनिल बाबर, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे, प्रांताधिकारी सचिन इथापे, तासगावचे तहसीलदार सुधाकर भोसले, कवठेमहांकाळचे तहसीलदार सचिन डोंगरे, भाई संपतराव पवार, विवेक गुळवणी, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंतराव कवडे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत डुबल, डी. डी. कांबळे उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, दुष्काळी भागासाठी शाश्वत पाणी उपलब्ध झाले पाहिजे. राज्य शासनाने सुमारे पाच हजार गावे जलयुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. जुने बंधारे दुरूस्त करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. शेती व पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी पाणलोट कार्यक्रम प्रभावीपणे राबविले पाहिजेत. त्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल. राज्यात सध्या लोकसहभागातून २४० कामे उभी राहिली आहेत. अग्रणी पुनरुज्जीवनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून लोकसहभागातून प्रभावी कामे होतात, असे सांगितले.
यावेळी आ. अनिल बाबर, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, तासगावचे तहसीलदार सुधाकर भोसले यांनीही मते मांडली. (वार्ताहर)
आ. अनिल बाबर यांनी, शासनाने शेततळी प्लॅस्टिक कागदासह मंजूर करण्याबाबत व रोहयो विहिरीसाठी असलेली ५०० मीटर अंतराची अट शिथिल करण्याबाबत सचिव प्रभाकर देशमुख यांनी शासनस्तरावर प्रयत्न करावेत, तसेच रोहयो विहिरीच्या लाभार्थींना वीज कनेक्शन तातडीने कशी मिळतील हे पाहावे, अशी सूचना केली.
कामाचे कौतुकच नाही!
अग्रणी पुनरुज्जीवन कामासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहा लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून जाधववाडी परिसरात कामे झाली. तेथील लाभार्थ्यांनी आम्ही केलेल्या कामांचे काहीच कौतुक केले नाही. प्रशासनानेही त्याची दखलही घेतली नाही, अशी नाराजी विवेक गुळवणी यांनी व्यक्त केली.