साठ वर्षांवरील मोलकरीण शासनाच्या मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:28 IST2021-05-13T04:28:08+5:302021-05-13T04:28:08+5:30
सांगली : राज्य शासनाने मोलकरीण महिलांना लॉकडाऊनमध्ये तातडीने आर्थिक साहाय्य म्हणून १५०० रुपये देण्याचे घोषित केले आहे. पण या ...

साठ वर्षांवरील मोलकरीण शासनाच्या मदतीपासून वंचित
सांगली : राज्य शासनाने मोलकरीण महिलांना लॉकडाऊनमध्ये तातडीने आर्थिक साहाय्य म्हणून १५०० रुपये देण्याचे घोषित केले आहे. पण या मदतीपासून ६० वर्षांवरील मोलकरीण महिला वंचित राहिल्या आहेत. शासनाने आदेशात बदल करून त्यांना मदत द्यावी, अशी मागणी घरकामगार मोलकरीण संघटनेचे अध्यक्ष कॉ. शंकर पुजारी यांनी केली.
ते म्हणाले की, कोरोनामुळे मोलकरीण महिलांचे कुटुंब रोजगार नसल्यामुळे अर्धपोटी जीवन जगत आहे. त्यांना शासनाकडून मोलकरीण महिला म्हणून काहीही मदत मिळाली नाही. ओळखपत्राचे नूतनीकरण केलेले नसले तरीसुद्धा ३० एप्रिलपर्यंत महिलांनी ओळखपत्र काढलेले असेल, त्या सर्वांना हे आर्थिक साहाय्य मिळणार आहे. ज्या मोलकरीण महिलांचे वय ६० वर्षे पूर्ण झालेले असतील त्यांना लाभ मिळणार नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये पाच लाखापेक्षा जास्त मोलकरीण महिलांनी नोंदणी केली आहे. साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मोलकरीण महिलांना पेन्शन मिळायला पाहिजे. परंतु शासनाने पेन्शनचा निर्णय केलेला नाही. त्यामुळे ज्या महिलांनी २०११ पासून सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामधून ओळखपत्र घेतलेले असेल आणि त्यांची ६० वर्षे पूर्ण झाली असली तरी त्या सर्वांना लाभ देणे आवश्यक आहे. याबाबतचे निवेदन सांगली सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना दिले.
यावेळी महाराष्ट्र घरकामगार मोलकरीण संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ. सुमन पुजारी, सचिव कॉ. विजय बचाटे आदी उपस्थित होते.