महेश जाधवकडून मिरजेत दहा कोटींची इमारत खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:19 IST2021-07-04T04:19:13+5:302021-07-04T04:19:13+5:30
मिरज : मिरजेतील ॲपेक्स हॉस्पिटलचा संचालक डाॅ. महेश जाधव याने सांगली-मिरज रस्त्यावर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी दहा कोटीच्या इमारत खरेदीचा ...

महेश जाधवकडून मिरजेत दहा कोटींची इमारत खरेदी
मिरज : मिरजेतील ॲपेक्स हॉस्पिटलचा संचालक डाॅ. महेश जाधव याने सांगली-मिरज रस्त्यावर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी दहा कोटीच्या इमारत खरेदीचा करार केल्याचे पोलीस चाैकशीत निष्पन्न झाले आहे. महागडी वाहने व स्थावर मालमत्ता खरेदीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले असल्याने पोलीस डाॅ. जाधव याच्या आर्थिक व्यवहारांची चाैकशी करीत आहेत.
दरम्यान, त्याला मदत करणाऱ्या सांगलीतील डॉक्टरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सांगलीच्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. मिरजेतील ॲपेक्स रुग्णालय प्रकरणात आणखी काही डाॅक्टरांवर अटकेची टांगती तलवार असल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ॲपेक्स रुग्णालयात ८७ कोविड रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयाचा संचालक डाॅ. महेश जाधव, त्याचा भाऊ मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. मदन जाधव यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी डाॅ. जाधव बंधूंसह रुग्णालयातील कर्मचारी व तीन रुग्णवाहिका चालकांसह १३ जणांना अटक केली आहे. डॉ. जाधव बंधूंची न्यायालयीन काेठडीत रवानगी झाली आहे.
मिरजेत सांगली रस्त्यावर दुचाकी वाहनांचे शोरूम भाड्याने घेऊन तेथे ॲपेक्स कोविड रुग्णालय चालविणाऱ्या डाॅ. महेश जाधव याने मिरजेत मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याची तयारी केली होती. यासाठी डाॅ. जाधव बंधूंनी मिरज-सांगली रस्त्यावर १० कोटी रुपयांच्या २१ हजार चाैरस फुटाच्या नवीन इमारत खरेदीचा करार करून दीड कोटी रुपये आगाऊ रक्कम दिल्याचे पोलीस चाैकशीत निष्पन्न झाले आहे. डाॅ. जाधव याने महागडी वाहने व स्थावर मालमत्ता खरेदीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले असल्याने त्याच्याकडे ही रक्कम कोठून आली, याची पोलिसांनी चाैकशी सुरू केली आहे. डाॅ. जाधव यास मदत करणाऱ्या आणखी काही जणांना पोलीस चाैकशीसाठी पाचारण करणार असल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.