ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST2021-01-19T04:28:49+5:302021-01-19T04:28:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अत्यंत अटीतटीने झालेल्या जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व सिद्ध केले. मिरज वगळता ...

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अत्यंत अटीतटीने झालेल्या जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व सिद्ध केले. मिरज वगळता इतर तालुक्यांत भाजपला अपेक्षित यश मिळवता आले नाही. कडेगावात काँग्रेसने सर्व ग्रामपंचायतींत एकहाती सत्ता मिळवली, तर तासगाव तालुक्यात राष्ट्रवादीने आणि जत तालुक्यात काँग्रेसने आघाडी मिळवली. स्थानिक आघाड्यांनीही अनेक गावांत सत्ता स्थापन केली आहे.
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती, यातील नऊ गावे बिनविरोध झाल्याने १४३ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. सोमवारी तालुकास्तरावर सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. अवघ्या दोन तासांत सर्व जागांवरील कल स्पष्ट झाले. दुपारी सर्व निकाल जाहीर झाले.
तासगाव तालुक्यात ३६ गावांत निवडणूक झाली. यात १६ ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या आघाडीने ताब्यात घेतल्या, तर नऊ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे खासदार संजयकाका पाटील गटाची सत्ता आली आहे. उर्वरित ११ ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्यांनी यश मिळवले.
मिरज तालुक्यातील २२ पैकी सहा ठिकाणी भाजप, तर प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर काँग्रेस-राष्ट्रवादीने विजय मिळवला. म्हैसाळमध्ये राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले असून, तेथे भाजपने सत्तांतर घडवले.
पलूस तालुक्यातील १२ पैकी चार गावांत कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या काँग्रेसच्या पॅनेलने, पाच गावांत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने, तर तीन ठिकाणी स्थानिक आघाड्यांना यश मिळाले.
जत तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. त्यात ११ ठिकाणी काँग्रेसप्रणीत पॅनेल, नऊ गावांत भाजप, तर नऊ गावांत स्थानिक आघाड्यांनी यश मिळवले.
खानापूर तालुक्यातील ११ पैकी नऊ गावांत आमदार अनिल बाबर गटाच्या शिवसेनाप्रणीत पॅनेलचा झेंडा फडकला आहे, तर तीन ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळाले. भाजपला खातेही खोलता आले नाही.
कडेगाव तालुक्यातील सर्व नऊ ग्रामपंचायतींवर कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने विजय मिळवला असून, या तालुक्यात भाजपच्या पॅनेलला खातेही खोलता आले नाही.
कवठेमहांकाळ तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींपैकी सहा ठिकाणी राष्ट्रवादी, तर प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींवर अजितराव घोरपडे व खासदार संजयकाका पाटील गटाने विजय मिळवला. एका गावात घोरपडे आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त पॅनलने विजय मिळवला.
शिराळा तालुक्यातील दोनपैकी एका ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक गटाने, तर बिळाशी येथे आमदार नाईक व सत्यजीत देशमुख गटाने बाजी मारली.
वाळवा तालुक्यातील मसूचीवाडी येथे राष्ट्रवादीने, तर भाटवाडी येथे विकास आघाडीने यश मिळवले.
आटपाडी तालुक्यातील आठपैकी पाच गावांत आ. अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पॅनलने बाजी मारली, तर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या गटाने तीन ठिकाणी यश मिळवले.
चौकट
राष्ट्रवादीला धक्का
मिरज तालुक्यातील म्हैसाळ ग्रामपंचायतीवर मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या गटाची दहा वर्षे सत्ता होती. तिला सुरुंग लावत भाजपने ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे.
चौकट
तालुकानिहाय सत्ता मिळालेल्या ग्रामपंचायती
तालुका एकूण ग्रामपंचायती सत्ता मिळालेल्या आघाडी
मिरज २२ : भाजप ६, काँग्रेस ३, राष्ट्रवादी ३, स्थानिक आघाडी १२
तासगाव ३६ : राष्ट्रवादी १६, भाजप ९, स्थानिक आघाडी ११
पलूस १२ : महाविकास आघाडी ९, भाजप ३
कवठेमहांकाळ ११ : राष्ट्रवादी ६, अजितराव घोरपडे गट २, भाजप २
कडेगाव ९ : सर्व ठिकाणी काँग्रेस
शिराळा २ : आ. मानसिंगराव नाईक गट १, आ. नाईक व सत्यजीत देशमुख गट १
वाळवा २ : राष्ट्रवादी १, विकास आघाडी १
खानापूर ११ : शिवसेना ९, राष्ट्रवादी ३
जत ३० : काँग्रेस ११, भाजप ९, स्थानिक आघाडी ९
आटपाडी ८ : शिवसेना ५, भाजप ३