महिलांच्या सन्मानात महाराष्ट्र अग्रेसर : आर. आर. पाटील
By Admin | Updated: June 29, 2014 00:38 IST2014-06-29T00:35:33+5:302014-06-29T00:38:16+5:30
तासगांव : देशस्तरावर अन्य कुठल्याही राज्यापेक्षा महिलांची सुरक्षा व सन्मानाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर

महिलांच्या सन्मानात महाराष्ट्र अग्रेसर : आर. आर. पाटील
तासगांव : देशस्तरावर अन्य कुठल्याही राज्यापेक्षा महिलांची सुरक्षा व सन्मानाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तुरची (ता. तासगाव) येथे केले. तुरचीच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात आयोजित वृक्षदिंडी, वृक्षारोपण व धावपट्टीच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य दिलीप भुजबळ, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील महिला पदाधिकारी उपस्थित होते.
गृहमंत्री पाटील म्हणाले, नुकतेच संसदेत देशाच्या गृहमंत्र्यांनी केलेल्या भाषणात महाराष्ट्र महिलांना मिळणाऱ्या सुरक्षा, सन्मानाचा उल्लेख केला. महिलांची सुरक्षितता, मुलींचे शिक्षण, आरोग्य यासाठी महिला लोकप्रतिनिधींनी जागृत होऊन भूमिका पार पाडावी. बिघडलेले पर्यावरण, वाढलेली धूप, कमी होत चाललेला पाऊस यावर वृक्षारोपण हा एकमेव उपाय असून, महिलांनी यापुढे पाच मैत्रिणी, पाच झाडे असा संकल्प करावा, असेही ते म्हणाले.
आर. आर. पाटील म्हणाले, राज्यात पोलीस जनतेशी सरळ बोलत नाहीत. त्यांचा वचक राहिला नाही. अशा तक्रारी येतात. याबाबतीत लोकशाहीत सामान्यातला सामान्य देशाचा मालक आणि मोठ्यातला मोठा अधिकारी हा जनतेचा सेवक आहे. हे संस्कार प्रशिक्षण काळातच व्हायला हवेत. या पुढच्या काळात प्रशिक्षणाचाच भाग म्हणून एक गाव, एक अधिकारी ही संकल्पना राबवण्यात यावी. गावात लोकांच्यात जाऊन अधिकाऱ्यांनी काम करावे, त्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी, असे ते म्हणाले.
प्रारंभी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते कवायत मैदानापर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली. यात महिलांचा सहभाग मोठा होता. गृहमंत्री पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण व श्रमदानातून तयार करण्यात आलेल्या धावपट्टीचे उदघाटनही करण्यात आले.
प्राचार्य दिलीप भुजबळ यांनी केले. सामाजिक वनिकरणचे सहाय्यक संचालक दशरथ गोडसे, उपाधीक्षक दत्तात्रय केडगे, सावर्डेच्या ग्रा. पं. सदस्या भारती माने, कुमठेच्या सरपंच डॉ. भारती पाटील, जि. प. सदस्या योजना शिंदे, सुरेखा कोळेकर आदींची भाषणे झाली. उपप्राचार्य यासीन मोमीन यांनी आभार मानले. (वार्ताहर)