महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय सुविधा हव्या
By Admin | Updated: March 3, 2015 00:26 IST2015-03-02T23:45:33+5:302015-03-03T00:26:43+5:30
जयंत पाटील : व्यवस्था सुधारण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय सुविधा हव्या
इस्लामपूर : भविष्यातील महाराष्ट्र घडवताना पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असायला हव्यात. जगाच्या पाठीवरील उत्तम व्यवस्था महाराष्ट्रात असल्या पाहिजेत. हे विकासाचे अंतिम ध्येय असावे. त्यामुळे महाराष्ट्राची तुलना जगातील चांगल्या देशांशी होऊ शकते, असा विश्वास माजी ग्रामविकास मंत्री आमदार जयंत पाटील यांनी रविवारी व्यक्त केला.
येथील सार्वजनिक तालुका वाचनालयाच्या व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना आ. पाटील बोलत होते. ‘महाराष्ट्र असा असावा.. असा घडवावा’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. ते म्हणाले की, राज्याला विकासाच्या वाटेवर घेऊन जाताना प्राथमिक शिक्षण, आरोग्य, दळणवळण, प्रशासन, उद्योग आणि न्यायपालिका अशा सगळ्या व्यवस्था पारदर्शी असायला हव्यात. या सगळ्या व्यवस्थांमधून सुसंस्कृत पिढीचा महाराष्ट्र घडवणे शक्य आहे.
आ. पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील काही जिल्हे प्रगत, तर मराठवाडा, विदर्भ, खानदेश व कोकणातील बहुतेक जिल्हे मागास राहिले आहेत. महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या जरी प्रगत असला तरी, विकासाचा प्रादेशिक असमतोल राहिला आहे. त्यामुळे या मागास जिल्ह्यांना जास्त न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
राज्याचा विकास करताना मूलभूत व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. प्रगतीसाठी संधी निर्माण करून दिल्या पाहिजेत. सुरक्षित औद्योगिक वातावरण निर्माण करुन पाणी, वीज व अन्य सुविधा किफायतशीर दरात दिल्या पाहिजे. जगाच्या तुलनेत आपल्याकडे सेवा क्षेत्राचा विस्तार झाला. मात्र उत्पादकता क्षेत्र वाढले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मेक इन इंडिया’ हे नवे धोरण जाहीर केले आहे. प्रत्येक गोष्ट भारतात निर्माण झाली पाहिजे, हा त्यांचा आग्रह स्तुत्य आहे. मात्र त्यासाठी तांत्रिक कौशल्ये विकसित करावी लागतील. महाराष्ट्रात उत्पादकता क्षेत्र मोठे आहे. त्याचा फायदा घ्यायला हवा.
राज्यात ज्याच्या कागदावर वजन जास्त त्याला लवकर न्याय आणि हलक्या कागदाला किंमत दिली जात नाही, हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे, हे सांगत आ. पाटील यांनी राज्यकर्त्यांना नव्या घोषणा करण्यात रस मात्र असून व्यवस्था सुधारण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली.
दीनानाथ लाड यांनी स्वागत केले. संजय ढोबळे-पाटील, अॅड. बी. एस. पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, अॅड. धैर्यशील पाटील, अॅड. अरविंद पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
भविष्याचा विचार करून विकासकामे व्हावीत
महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या जरी प्रगत असला तरी, विकासाचा प्रादेशिक असमतोल राहिला आहे. राज्याचा विकास करताना मूलभूत व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. संधी निर्माण केल्या पाहिजेत. सर्व सुविधा किफायतशीर दरात दिल्या पाहिजे. जगाच्या तुलनेत आपल्याकडे सेवा क्षेत्राचा विस्तार झाला. मात्र उत्पादकता क्षेत्र वाढले नाही. यापुढे विकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणताना भविष्याचा विचार झाला पाहिजे. जगातील सर्वोत्तम अशा आंतरराष्ट्रीय सुविधा महाराष्ट्राला मिळाल्या पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मेक इन इंडिया’ हे नवे धोरण जाहीर केले आहे. प्रत्येक गोष्ट भारतात निर्माण झाली पाहिजे, हा त्यांचा आग्रह स्तुत्य आहे. त्यांनी महाराष्ट्रात असलेल्या मोठ्या उत्पादकता क्षेत्राची दखल घेऊन त्यांच्या योजनेसाठी त्याचा फायदा घ्यायला हवा. त्यातून महाराष्ट्रही विकासाच्या मार्गावर आणखी पुढे जाईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.