इस्लामपुरात विकास आघाडीतून महाडिक गट बाहेर पडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:47 IST2021-02-06T04:47:16+5:302021-02-06T04:47:16+5:30
इस्लामपूर : नगरपालिकेत दोन वर्षांपासून महाडिक गटाला न्याय दिला जात नाही, दखलही घेतली जात नाही. त्यामुळे विकास आघाडीतून बाहेर ...

इस्लामपुरात विकास आघाडीतून महाडिक गट बाहेर पडणार
इस्लामपूर : नगरपालिकेत दोन वर्षांपासून महाडिक गटाला न्याय दिला जात नाही, दखलही घेतली जात नाही. त्यामुळे विकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असा इशारा महाडिक युवा शक्तीचे माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
ओसवाल म्हणाले की, साखराळे येथील निवृत्त सैनिकांवर प्लॉट मिळण्याबाबत अन्याय झाला होता. रयत क्रांती संघटनेचे माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नगरसेवक आनंदराव पवार यांनी भेट घेऊन उपोषणकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. याची दखल विकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी घेतली नाही.
ते म्हणाले की, इस्लामपूर नगर परिषदेच्या अण्णासाहेब डांगे सभागृहात डांगे यांचे तैलचित्र व जीवनपट माहितीफलक लावण्यात यावा आणि नगर परिषदेच्या काळा मारुती मंदिराशेजारच्या व्यापारी संकुलास नानासाहेब महाडिक यांचे नाव देण्यात यावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तांदळे यांनी गुरुवारी १४ तासांचे लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाकडे विकास आघाडीतील काही नेत्यांनी पाठ फिरविली. या नाराजीतून महाडिक गटातील माझ्यासह नगरसेवक अमित ओसवाल, नगरसेवक चेतन शिंदे, माजी नगरसेवक सतीश महाडिक, जलाल मुल्ला विकास आघाडीतून बाहेर पडणार आहोत.
कपिल ओसवाल यांचे आरोप म्हणजे विकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.
अस्मितेचा मुद्दा
नानासाहेब महाडिक यांना महाडिक गटाचे कार्यकर्ते दैवत मानतात. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात आघाडी करण्यासाठी नानासाहेबांनी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या प्रयत्नानेच नगरपालिकेत सत्तांतर झाले. व्यापारी संकुलाला त्यांचे नाव देण्यासाठी चंद्रकांत तांदळे उपोषणाला बसले आहेत. मात्र, त्यांना विकास आघाडीतून पाठिंबा मिळत नसल्याने हा महाडिक गटाच्या अस्मितेचा प्रश्न बनला आहे.
फोटो - ०४०२२०२१- आयएसएलएम- राहुल महाडिक महाडिक, सम्राट महाडिक (सिंगल फोटो)