महादेव कुंभारच्या आत्महत्येने ‘सोशल चटका’!

By Admin | Updated: November 28, 2014 20:25 IST2014-11-27T23:08:59+5:302014-11-28T20:25:38+5:30

वाळव्यातील घटना : ‘सोशल मीडिया’च्या विश्वात हळहळ; त्याने केला स्वत:चा मृत्यू ‘शेअर’

Mahadev pottery suicide 'social chat'! | महादेव कुंभारच्या आत्महत्येने ‘सोशल चटका’!

महादेव कुंभारच्या आत्महत्येने ‘सोशल चटका’!

सचिन लाड -सांगली‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या माध्यमातून स्वत:लाच आदरांजली वाहून तरुणाने आत्महत्या केल्याने, सोशल मीडियाच्या विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. वाळवा येथे सोमवार, दि. २४ रोजी हा प्रकार घडला. महादेव जगन्नाथ कुंभार (वय २२) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
ग्रामीण भागातील तरुणाईमध्येही सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. आपण आज काय केले, कोठे फिरायला गेलो अशा फुटकळ बाबी ते ‘व्हॉटस् अ‍ॅप’ आणि ‘फेसबुक’च्या माध्यमातून शेअर करत असतात. मात्र महादेव कुंभारने ‘कै. महादेव कुंभार : भावपूर्ण श्रद्धांजली’ असा मेसेज स्वत:च ‘व्हॉटस् अ‍ॅप’वरून पाठवून आत्महत्या केली.
कासारशिरंबे (ता. कऱ्हाड) येथील कुंभार कुटुंबातील महादेव दहावी अनुत्तीर्ण होता. दहावीत तीन विषय गेल्याने त्याने पुढे शिक्षणच घेतले नाही. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची. आई, वडील नेहमी आजारी असतात. महादेवला दोन बहिणी. त्यांचे लग्न झाले आहे. गावात कामधंदा मिळत नसल्याने महादेव आई, वडिलांना घेऊन वर्षापूर्वी वाळवा येथे उदरनिर्वाहासाठी स्थायिक झाला होता. नवेखेड रस्त्यावर त्याचे फाटके घर आहे. आई, वडील शेतात मजुरीसाठी जातात, तो सेंट्रींगच्या कामावर जायचा. काम नाही मिळाले तर तो घरीच बसून असे. त्याला मोबाईलचा प्रचंड नाद होता. एकलकोंड्या स्वभावाचा महादेव दिवस-दिवसभर मोबाईलवर असे.
चार दिवसांपूर्वी त्याने ‘कै. महादेव कुंभार : भावपूर्ण श्रद्धांजली’ असा मेसेज स्वत:च ‘व्हॉटस् अ‍ॅप’वरून मित्रांना पाठवला होता. मात्र मित्रांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सोमवारी अचानक त्याने आई-वडील मजुरीसाठी गेल्यानंतर घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर पोस्टची चर्चा सुरू झाली.


‘लव्ह स्टोरी एन्ड’चा मेसेजही पाठविला...
महादेवने आत्महत्या करण्यापूर्वी चार दिवस अगोदर ‘व्हॉटस् अ‍ॅप’वरून ‘लव्ह स्टोरी एन्ड’ असेही मेसेज मित्रांना पाठविल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्याचे एखाद्या तरुणीवर प्रेम असण्याची शक्यता आष्टा पोलिसांनी व्यक्त केली. त्याचा मोबाईलही गायब आहे. यामुळे त्याचे मित्र कोण आहेत, हे अद्याप समजलेले नाही. पोलिसांनी आज (गुरुवार) त्याच्या घराची झडती घेतली, पण मोबाईल सापडला नाही.



व्हॉटस् अ‍ॅप व फेसबुकचा वापर करण्याचे ज्ञान नसल्याने त्याचा दुरुपयोग होत आहे. दैनंदिन जीवनात घडलेल्या गमतीजमती सांगण्याशिवाय, सामाजिक व शैक्षणिक कामासाठीही त्याचा वापर करता येऊ शकतो. यासाठी किती वेळ घालवायचा, याचेही भान हवे. महादेव कुंभारने केलेली आत्महत्या सवंग लोकप्रियतेच्या मागे लागण्याची मानसिकता आहे. महादेवला तणाव व नैराश्य आल्याची जाणीव होती. यावर उपचार होऊ शकले असते. मात्र तसे न करता त्याने आत्महत्येचा निवडलेला मार्ग म्हणजे विकृत मानसिकताच म्हणावी लागेल. हे कृत्य करून त्याने समाजाची मानसिकता बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. - डॉ. प्रदीप पाटील, मानसोपचारतज्ज्ञ, सांगली.

Web Title: Mahadev pottery suicide 'social chat'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.