इस्लामपूर नगरपालिकेच्या भूखंडावर माफियांचा डोळा
By Admin | Updated: May 12, 2015 23:40 IST2015-05-12T23:24:57+5:302015-05-12T23:40:08+5:30
राखीव जागा : पदाधिकारीही सामील असल्याची चर्चा

इस्लामपूर नगरपालिकेच्या भूखंडावर माफियांचा डोळा
अशोक पाटील - इस्लामपूर -इस्लामपूर शहरात जागेचे दर गगनाला भिडले आहेत. याचा फायदा काही भूखंड माफियांनी उठवला आहे. मंत्री कॉलनीतील बँक कर्मचारी कॉलनीने राखीव ठेवलेला भूखंड हडप करण्यासाठी काही माफिया सरसावले आहेत. त्यांना पालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे. परिसरातील नागरिक त्यांच्याविरोधात दबक्या आवाजात चर्चा करतात, परंतु त्यांच्याविरोधात तक्रार करण्यास कोणीही धजावत नाही.
उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मंत्री कॉलनीतील जागांचे दर सरासरी १५ ते २५ लाख रुपये गुंठा याप्रमाणे सुरू आहेत. याच मंत्री कॉलनीत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शिवाजी हौसिंग सोसायटी स्थापन करून जागा खरेदी केल्या होत्या. सध्या या सोसायटीचे नाव बदलून बँक कर्मचारी कॉलनी असे केले आहे. याच कॉलनीतून पालिकेचा ८0 फुटी रस्ता जातो. त्यामुळे येथील जागांचे भाव चांगलेच वधारले आहेत. त्यातील काही भूखंड माफियांनी परस्पर विकून मोठा घोटाळा केला आहे. या घोटाळ्याची प्रकरणे न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत.
काहींनी स्वत:च्या जागेपेक्षा अतिरिक्त बांधकाम करून जागा हडप केल्या आहेत. याच कॉलनीत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी बाग अथवा सामाजिक मंदिरासाठी ठेवलेली पाच गुंठे जागा पालिकेने ताब्यात घेतली आहे. परंतु ही जागा आता भूखंड माफियांच्या नजरेत भरली आहे. ही जागा हडप करण्याचा डाव शिजत असून काहींनी पालिकेने जागेला घातलेले कुंपण मोडले आहे. त्या परिसरातील वाहनमालक या मोकळ्या जागेत गाड्या लावत आहेत. एका बहाद्दराने तर आपली म्हैस बांधण्यासाठी या जागेचा वापर सुरू केला आहे. या जागेवर याच परिसरातील एकाने स्वामी समर्थांचे मंदिर बांधण्याचा प्रस्ताव नगरपालिकेकडे सादर केला आहे. तो जवळजवळ मंजूर होण्याच्या मार्गावर असतानाच, या जागेत मंदिर बांधू नये म्हणून काही माफियांनी त्याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविल्याचीही चर्चा आहे. त्यामुळेच या माफियांच्या विरोधात तक्रार करण्यास कोणीही धजावत नाही. पालिकेने पुन्हा एकदा या जागेला कुंपण घालावे अथवा बगीचा तयार करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.