माधवनगरात अतिक्रमणे काढली-
By Admin | Updated: February 19, 2015 23:42 IST2015-02-19T23:23:05+5:302015-02-19T23:42:09+5:30
-लोकमतचा दणका-- पोलिसांनी कारवाईबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेबद्दल वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

माधवनगरात अतिक्रमणे काढली-
सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथील रस्त्यावरील विक्रेत्यांची अतिक्रमणे व यातून होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच संजयनगर पोलिसांनी बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवस मोहीम राबवून सर्व अतिक्रमणे काढून टाकली. पोलिसांनी कारवाईबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेबद्दल वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. वाहतुकीला अडथळा होईल, अशी वाहने उभी राहणार नाहीत, यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. माधवनगरचा बसथांबा ते जकात नाका मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने विक्रेत्यांनी व्यवसाय करण्यासाठी अतिक्रमणे केली होती. काही व्यापाऱ्यांनी दुकानासमोर अतिक्रमणे केली होती. खरेदीनिमित्त येणारे वाहनधारक दुकानासमोरच वाहन लावत असत. यामुळे वाहतुकीची कोंडी व्हायची. यातून दररोज लहान-मोठे अपघात होत असत. गेल्या आठवड्यात या अतिक्रमणांमुळे एकाचा बळी घेतला. ट्रकने ठोकरल्याने एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता. तत्पूर्वीही अशा अनेकांचा अपघातात बळी गेला आहे, तर काहीजणांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. अतिक्रमणामुळे वाहतूक विस्कळीत होत असताना, पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. याविरुद्ध ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच पोलीस खडबडून जागे झाले.
संजयनगर पोलिसांचे एक पथक व वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून बुधवारी सकाळपासून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. रस्त्यावरील सर्व विक्रेत्यांना हाकलून लावले. ज्या व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर रस्त्यावर टेबल मांडून व्यवसाय वाढविला होता, त्यांचीही अतिक्रमणे काढली. यापुढे अतिक्रमण केल्यास माल जप्त करुन कडक कारवाई केली जाईल, असा पोलिसांनी इशारा दिला आहे. आज, गुरुवारी सकाळीही पोलिसांनी माधवनगरमध्ये तळ ठोकला होता. परंतु एकही अतिक्रमण दिसून आले नाही. (प्रतिनिधी)
रस्ता झाला मोकळा...
वाहने रस्त्यावर उभी राहून वाहतूक विस्कळीत होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे रस्ता मोकळा झाला आहे.