माधवनगर रेल्वे स्थानकाचं रुपडं बदलतंय!
By Admin | Updated: March 12, 2015 23:54 IST2015-03-12T21:42:01+5:302015-03-12T23:54:17+5:30
रंगरंगोटी सुरू : दहा वर्षांनंतर प्रशासनाची नजर; प्रवाशांची संख्या वाढण्याची गरज--लोकमतचा प्रभाव

माधवनगर रेल्वे स्थानकाचं रुपडं बदलतंय!
सचिन लाड - सांगली माधवनगर (ता. मिरज) येथील रेल्वे स्थानकाच्या दुरवस्थेचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. गेल्या दहा दिवसांपासून स्थानकाच्या इमारतीची रंगरंगोटी करण्याचे काम सुरु आहे. परिसरातील झाडेझुडपे काढली जात आहेत. तब्बल दहा वर्षांनंतर रेल्वे प्रशासनाची नजर या स्थानकाकडे गेल्याने, सुधारणांच्या कामाला गती आली आहे. दिवसभरात दोनच रेल्वे थांबत असल्या तरी, सर्व सोयींनीयुक्त स्थानक झाल्यास प्रवाशांची संख्या वाढू शकते.
माधवनगर जकात नाक्यापासून दीड किलोमीटर अंतरावर हे रेल्वे स्थानक आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. कोल्हापूर-पुणे, पुणे-कोल्हापूर व सातारा-कोल्हापूर या तीनच पॅसेंजर येथे थांबतात. पंधरा वर्षांपूर्वी हे स्थानक सुस्थितीत होते. तिकीट घर व प्रवाशांना थांबण्यासाठी हॉल होता. तिकीट विक्री करणारा कर्मचारी रेल्वे येण्यापूर्वी अर्धा तास अगोदर यायचा. रेल्वे येऊन गेली की, तो पुन्हा निघून जायचा. पण स्थानक गैरसोयीचे असल्याने प्रवाशांची संख्या घटत गेली. त्यामुळे स्थानकही बंद करण्यात आले. हीच संधी साधून चोरट्यांनी धुमाकूळ घातला. स्थानकाच्या छतावरील सिमेंटचे पत्रे, अँगल काढून नेले. शिल्लक असलेल्या खिडक्या भिंती पोखरून नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या सिमेंटच्या बाकांची मोडतोड केली आहे. स्थानकाच्या बाजूने असलेल्या संरक्षक लोखंडी जाळीच्या पट्ट्याही काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. भिंतीवर अश्लील मजकूर लिहिला आहे.
या स्थानकाच्या दुरवस्थेवर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला. याची प्रशासनाने दखल घेऊन स्थानकाची रंगरंगोटी केली आहे. परिसरातील झाडेझुडपे काढून टाकली आहेत. स्थानकाच्या इमारतीला अद्याप दारे व खिडक्या बसविलेल्या नाहीत. कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. स्थानक सुधारणेचे हे काम टप्प्या-टप्प्याने केले जाणार असल्याचे समजले.
नशेच्या गोळ्यांचा खच कायम
स्थानकाच्या रंगरंगोटीचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाले आहे. सध्या येथे कोणतेही काम सुरु नाही. त्यामुळे अश्लील चाळे करणाऱ्या आंबटशौकीनांची वर्दळ पुन्हा वाढली आहे. स्थानकाच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्या, नशेच्या गोळ्यांचा खच पडला आहे. निरोधही मोठ्या प्रमाणात फेकून दिलेले दिसतात. विजेची कोणतेही सोय नाही. यामुळे रात्रीच्यावेळी मेणबत्ती लावून पार्ट्याही सुरु असतात. हे प्रकार रोखण्यासाठी आता प्रशासनाने येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोय करणे गरजेचे आहे.
स्थानकाच्या छतावरील सिमेंटचे पत्रे, अँगल काढून नेले असून मोठे नुकसान केले आहे. या स्थानकावर सुरक्षा रक्षक ठेवण्याची गरज आहे. तरच येथे प्रवाशांची संख्या वाढणार आहे.
हे रेल्वे स्थानक माधवनगर, शांतिनिकेतन परिसरातील नागरिकांच्या सोयीचे आहे.