माधवनगर रेल्वे स्थानकाची दुरवस्था
By Admin | Updated: February 23, 2015 00:17 IST2015-02-22T23:09:44+5:302015-02-23T00:17:25+5:30
इमारत पोकळ : खिडक्या, दारे पळवली; लोखंडी पट्ट्या चोरण्याचा प्रयत्न

माधवनगर रेल्वे स्थानकाची दुरवस्था
सचिन लाड - सांगली -माधवनगर (ता. मिरज) येथील रेल्वे स्थानक इमारतीच्या खिडक्या, दारे चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. शिल्लक असलेल्या खिडक्याही भिंतीमधून पोखरुन काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. स्थानकाचे पत्रे काढून नेले आहेत. त्यामुळे इमारत पोकळ बनली आहे. स्थानकाच्या बाजूने असलेल्या संरक्षक लोखंडी जाळीच्या पट्ट्याही काढून नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. सांगलीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेले हे स्थानक सध्या बेवारस स्थितीत आहे. या स्थानकाचा वापर सध्या अश्लील चाळे करण्यासाठी केला जात आहे.
माधवनगर जकात नाक्यापासून किमान तीन किलोमीटर अंतरावर रेल्वे स्थानक आहे. पण प्रवाशांच्या गैरसोयीचे हे स्थानक आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. कोल्हापूर-पुणे, पुणे-कोल्हापूर व सातारा-कोल्हापूर या तीनच पॅसेंजर या स्थानकावर थांबतात. अन्य कोणत्याही रेल्वे थांबत नाहीत. पंधरा वर्षापूर्वी हे स्थानक सुस्थितीत होते. तिकीट घर व प्रवाशांना थांबण्यासाठी हॉल होता. तिकीट विक्री करणारा कर्मचारी रेल्वे येण्यापूर्वी केवळ अर्धा तास अगोदर यायचा. रेल्वे येऊन गेली की, तो पुन्हा निघून जायचा. स्थानक गैरसोयीचे असल्याने प्रवाशांची संख्या घटत गेली. त्यामुळे स्थानकही बंद करण्यात आले. हीच संधी साधून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.
स्थानकाच्या छतावरील सिमेंटचे पत्रे काढून नेले आहेत. लोखंडी खिडक्यांची जाळी व अँगल नेले आहेत. शिल्लक असलेल्या खिडक्या भिंती पोखरून नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रवाशांना बसण्यासाठी सिमेंटचे बाक होते. या बाकांची मोडतोड करण्यात आली आहे. स्थानकाच्या बाजूने असलेल्या संरक्षक लोखंडी जाळीच्या पट्ट्याही काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. भिंतीवर अश्लील वाक्ये लिहिण्यात आली आहेत. पॅसेंजर रेल्वे येण्यापूर्वीच प्रवाशांची वर्दळ असते. इतरवेळी येथे कोणीही नसते. हीच संधी साधून चोरटे स्थानकामधील इमारत पोकळ करुन त्यातील साहित्य लंपास करीत आहेत.
माधवनगरला व्यापारी पेठ म्हणून ओळखले जात असल्याने येथे चांगल्या रेल्वे स्थानकाची गरज आहे. मात्र गेल्या आठ-दहा वर्षात झालेली दुरवस्था पाहून रेल्वे प्रशासनाकडून हे स्थानक चांगल्याप्रकारे करण्याचा विचार नाही, असे दिसून येते. हेच स्थानक पुढे चिंतामणीनगर येथे केल्यास सर्वांच्या सोयीचे ठरु शकते. मध्यंतरी तशी मागणीही झाली होती. परंतु याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
युगुलांचा वावर, अश्लील चाळे
सांगलीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेले हे स्थानक सध्या बेवारस स्थितीत आहे. रेल्वे स्थानकात दिवसभर कोणीही नसते. त्यामुळे याचा वापर अश्लील चाळे करण्यासाठी केला जात आहे. भिंतीवर अश्लील वाक्ये लिहिण्यात आली आहेत. तिकीट घर खोलीत निंरोधची पाकिटे व नशेच्या गोळ्या पडलेल्या असतात. स्थानकाभोवती दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. स्थानकाचे ठिकाण निर्जन आहे. त्यामुळे येथे उतरण्यास प्रवासीही शक्यतो धाडस करीत नाहीत. एखादी गंभीर घटनाही घडू शकते. हे रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने येथे कायमस्वरुपी कर्मचारी नियुक्त करण्याची गरज आहे.