मदनभाऊंचे वारसदार राष्ट्रवादीच्या गळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST2021-06-04T04:20:41+5:302021-06-04T04:20:41+5:30
ओळी : दिवगंत मदनभाऊ पाटील यांची कन्या सोनिया होळकर यांची नाशिक युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ...

मदनभाऊंचे वारसदार राष्ट्रवादीच्या गळाला
ओळी : दिवगंत मदनभाऊ पाटील यांची कन्या सोनिया होळकर यांची नाशिक युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी सुरेखा ठाकरे, आदिती नलावडे, सक्षणा सलगर उपस्थित होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांची कन्या सोनिया सत्यजित होळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांची नाशिक महानगर युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदीही निवड करण्यात आली. मदनभाऊंच्या वारसदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता जयश्रीताई पाटील यांच्या निर्णयाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी वसंतदादा घराण्यात फूट पडली. दिवगंत विष्णुअण्णा पाटील, मदनभाऊ पाटील यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला; पण २००४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने मदनभाऊ यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले. या निवडणुकीत ते मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. त्यांना महिला व बालकल्याण मंत्रीपदही मिळाले. पण नंतरच्या दोन निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात मदनभाऊ गट सक्रिय आहे. त्यांच्या निधनानंतर या गटाची जबाबदारी त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्यावर आली. मदनभाऊ गटाचे १५ हून अधिक नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आहेत. काही महिन्यांपूर्वी जयश्रीताई पाटील या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती; पण मदनभाऊ गटातील काही ज्येष्ठ नेत्यांनी या निर्णयाला विरोध केल्याने त्यांचा प्रवेश लांबला होता. अशातच त्यांच्या कन्या सोनिया सत्यजित होळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचे सासर नाशिक आहे. त्यांची युवती राष्ट्रवादीच्या महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता जयश्रीताई पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.