मदनभाऊंचे कुपवाडसाठीचे योगदान तपासावे
By Admin | Updated: November 28, 2015 00:12 IST2015-11-28T00:06:42+5:302015-11-28T00:12:52+5:30
शरद पाटील : नामकरणाच्या विरोधात आयुक्तांना निवेदन

मदनभाऊंचे कुपवाडसाठीचे योगदान तपासावे
कुपवाड : महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांना मदनभाऊ पाटील यांच्याविषयीचे प्रेम अचानक उफाळून आले आहे. त्यामुळे कुपवाड शहरातील दिसेल त्या इमारतींना त्यांचे नाव देण्याचा उद्योग केला जात आहे. शहराचे नाव उंचावणाऱ्या स्वातंत्र्यसेनानी धोंडिरामबापू माळी यांच्याबरोबरच इतरांच्या नावांचे त्यांना विस्मरण होत आहे. त्यांनी मदनभाऊंचे कुपवाडसाठीचे योगदान तपासावे, असे मत माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी प्रा. पाटील म्हणाले की, माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या निधनानंतर महापालिकेत घेण्यात आलेल्या महासभेमध्ये कुपवाडमधील नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्रभाग कार्यालयाला मदनभाऊंचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला. यावेळी शहरवासीयांचे मत विचारात घेतले नाही. तसेच त्यांच्या हरकतीही मागविल्या नाहीत. तसेच एका सभेमध्ये केलेला ठराव पुढील सभेमध्ये इतिवृत्त मंजुरीनंतर कायम होतो. त्यामुळे या कायम न झालेल्या ठरावाची महापालिकेने कोणत्याही परिस्थितीमध्ये अंमलबजावणी करू नये. आयुक्तांनी त्याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याबरोबरच कुपवाड शहरातील थोर स्वातंत्र्यसेनानी धोंडिरामबापू माळी यांनी शहरासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांचे नाव देणे योग्य होईल. त्यामुळे नव्याने होणाऱ्या या कार्यालयास मदनभाऊ यांचे नाव देण्यास नागरिकांचा विरोध आहे. महापालिका पदाधिकारी व प्रशासनाने त्यांचे नाव देण्याचा प्रयत्न केल्यास हा बेकायदेशीर कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. महापौर विवेक कांबळे व स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्याचे त्यांनी यावेळी टाळले. जे ते आपापल्या लायकीप्रमाणे बोलत असतात, असे स्पष्ट करून त्यांना प्रा. पाटील यांनी बेदखल केले. (वार्ताहर)