मदनभाऊंचा असंगाशी संग
By Admin | Updated: June 28, 2015 23:14 IST2015-06-28T23:14:36+5:302015-06-28T23:14:36+5:30
मोहनराव कदम : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

मदनभाऊंचा असंगाशी संग
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अनुभव गाठीशी असताना, मदन पाटील यांनी पुन्हा असंगाशी संग केला आहे. एकदा फसवणूक होऊनही पुन्हा त्याच मार्गाने ते चालले आहेत, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी मदन पाटील आम्हाला सोडून जयंत पाटील यांच्या पॅनेलमध्ये गेले. ते फसविणारे लोक आहेत, असे आम्ही त्यांना सांगत होतो. तरीही त्यांनी काँग्रेसला सोडून असंगाशी संग केला. त्यानंतर निवडणुकीत प्रत्यक्ष फसवणुकीचा अनुभवही त्यांनी घेतला. त्यामुळे ते आता आपली चूक सुधारतील, असे वाटत होते. पण अनुभव गाठीशी असूनही त्यांनी पुन्हा तीच चूक केली आहे. त्यांच्या अशा निर्णयाने आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने लढलो, त्याच पद्धतीने पुन्हा मैदानात उतरणार आहोत. समविचारी लोकांना एकत्रित करून आम्ही लढत देऊ. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आम्ही चांगली लढत दिली होती. अपेक्षेपेक्षा चांगले यश आम्हाला मिळाले होते. बाजार समितीसाठीही चांगली तयारी झाली आहे. अजितराव घोरपडे आमच्याबरोबर आहेत. त्यांच्या आम्ही संपर्कात आहोत. अन्य काही नेतेही आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे आम्हाला चिंता करण्याचे कारण नाही. मदन पाटील यांनी एकदा केलेली चूक पुन्हा केल्यामुळे त्याचा फटका त्यांनाच बसणार आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठीची प्राथमिक तयारी आम्ही केलेली आहे, अशी माहिती कदम यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)