माधवनगर रस्त्यावर मदनभाऊंचा पुतळा
By Admin | Updated: October 22, 2015 00:50 IST2015-10-22T00:26:34+5:302015-10-22T00:50:52+5:30
महापालिका बैठकीत निर्णय : कुपवाड सभागृह व स्मारकाचे २ डिसेंबरला उद्घाटन

माधवनगर रस्त्यावर मदनभाऊंचा पुतळा
सांगली : काँग्रेसचे नेते, माजी मंत्री मदन पाटील यांचा माधवनगर रस्त्यावरील खुल्या भूखंडावर पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. गुरुवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत या जागेवर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्या जयंतीदिनी २ डिसेंबर रोजी कुपवाड प्रभाग कार्यालयाचे उद्घाटन व सभागृहाच्या नामकरणासह समाधीचेही काम पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. महापौर विवेक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला उपमहापौर प्रशांत पाटील, गटनेते किशोर जामदार, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, काँग्रेसचे सुरेश आवटी, राजेश नाईक, राष्ट्रवादीचे संजय बजाज, विष्णू माने, भाजपचे युवराज बावडेकर, स्वाभिमानीचे शिवराज बोळाज, बाळू गोंधळी, जगन्नाथ ठोकळे, उपायुक्त सुनील पवार, सुनील नाईक, सहायक आयुक्त रमेश वाघमारे, आर्किटेक्ट प्रमोद परीख उपस्थित होते.
यावेळी सर्वपक्षीय सदस्यांनी विविध सूचना केल्या. मदनभाऊंचे स्मारक वसंतदादा स्फूर्तिस्थळी येत्या दोन डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. कुपवाड येथील प्रभाग समिती कार्यालयाचे उद्घाटनही याचदिवशी घेण्याचे निश्चित करण्यात आले. समितीतील सभागृहाला मदनभाऊंचे नाव देण्याचा निर्णय घेतला. याची जबाबदारी उपमहापौर प्रशांत पाटील यांच्यावर सोपविण्यात आली.
शहरातील खुल्या भूखंडावर मदनभाऊंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. संजय बजाज यांनी मित्रमंडळ चौकातील जागा सुचविली, तर दिग्विजय सूर्यवंशी यांनी त्रिकोणी बागेसह महापालिकेच्या आवारातील प्रतापसिंह उद्यानात मदनभाऊंचा पुतळा उभारावा, असे सांगितले.
शेखर माने यांनी मदनभाऊंच्या पुतळ्यासह आर्ट गॅलरी व सांस्कृतिक भवन उभारण्याची सूचना केली. त्यासाठी स्टेशन चौकातील जागेचा पर्याय सुचविला. पण ही जागा वादग्रस्त असल्याने इतर जागांचा शोध घेऊन त्याठिकाणी भव्य स्मारक उभारण्यावर एकमत झाले.
काही सदस्यांनी माधवनगर रस्त्यावरील इंद्रप्रस्थनगरजवळील त्रिकोणी भूखंडाचा प्रस्ताव मांडला. एकूण ३२ गुंठे जागेपैकी रुंदीकरणातील जागा वजा जाता २० गुंठे जागा शिल्लक राहते. याठिकाणी पुतळा व उद्यान उभारण्यावर बैठकीत चर्चा झाली. जवळपास याच जागांवर पुतळा उभारण्यावर सत्ताधारी गटात एकमत झाले आहे. (प्रतिनिधी)
२ रोजी महासभा
येत्या २ नोव्हेंबर रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेच्या अजेंड्यावर मदनभाऊंचा पुतळा व स्मारकांच्या कामाचा विषय घेण्यात येणार आहे. सदस्यांनी केलेल्या सूचनांनुसार पुतळा व स्मारकाचा ठराव करण्यात येणार आहे. पुतळ्याचे काम मिरजेतील प्रसिद्ध शिल्पकार विजय गुजर यांना देण्यावर सदस्यांनी सहमती दर्शविली. आर्किटेक्ट प्रमोद परीख यांच्याकडून स्मारकाचे काम पूर्ण करून घेतले जाणार आहे. महिन्याभरात गतीने काम पूर्ण करू, असे महापौर विवेक कांबळे यांनी सांगितले.