मदन पाटील यांनीच गद्दारीची बीजे रोवली
By Admin | Updated: September 18, 2014 23:27 IST2014-09-18T22:51:56+5:302014-09-18T23:27:46+5:30
दिनकर पाटील : सांगलीच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा

मदन पाटील यांनीच गद्दारीची बीजे रोवली
सांगली : बंडखोरी व गद्दारीची बीजे मदन पाटील यांनीच रोवली आहेत. त्यामुळे दुसऱ्यावर याप्रश्नी टीका करण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही, असे मत माजी आमदार व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा मी अधिकृत उमेदवार असताना मदन पाटील यांनीच बंडखोरी केली होती. दाखवायचे आणि खायचे दात त्यांचेच वेगळे आहेत. त्यामुळे त्यांना असा आरोप दुसऱ्यावर करण्याचा अधिकार नाही. राष्ट्रवादीला त्यांनी गृहीत धरले नसल्याचे सांगितल्याने, विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घ्यायची, याचा निर्णय आम्ही लवकरच घेऊ. आ. संभाजी पवार व मदन पाटील या दोन्ही नेत्यांनी मतदारसंघासाठी काहीही केले नाही. वसंतदादा बँकेच्या प्रकरणात मदन पाटील यांनी तोंड उघडावे. त्यांचे मौन म्हणजे चोराला पाठीशी घालण्याचा प्रकार आहे. जनतेची एवढीच काळजी असेल, तर शेतकरी व कामगारांचे पैसे देण्याबाबत दादांच्या वारसदारांनी निर्णय घ्यावा.
खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले की, गेल्या २४ वर्षात सांगली विधानसभा मतदारसंघात एक अपवाद वगळता काँग्रेस नेहमीच याठिकाणी पराभूत झाली आहे. येथील जनतेने काँग्रेसच्या विरोधात कौल दिला आहे. पाचवेळा काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्यामुळे आघाडी झाली, तर सांगलीची जागा राष्ट्रवादीला मिळावी. त्याबाबत आम्ही पक्षाकडे आग्रह धरला आहे. आमच्याकडे सक्षम उमेदवारही आहेत. त्यामुळे ही जागा काँग्रेसला देण्यात येऊ नये. (प्रतिनिधी)
एकत्र येऊन संस्था बुडविल्या
दादा घराण्यात फूट नाहीच. वसंतदादांनी उभारलेल्या संस्था बुडविण्यासाठी ते एकत्रितच आहेत, अशी टीका दिनकर पाटील यांनी यावेळी केली.
मदन पाटील यांनी राष्ट्रवादीवर आघाडीपूर्वीच टीका केल्याने, आगामी निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची याबाबतचा निर्णय घेण्यासाठी येत्या २१ तारखेला सांगलीतील पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक होत आहे. या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती दिनकर पाटील यांनी दिली.