मासाळवाडी कालवा छत्तीस वर्षे कोरडाच!

By Admin | Updated: November 23, 2014 23:53 IST2014-11-23T23:17:48+5:302014-11-23T23:53:11+5:30

‘पाटबंधारे’चे दुर्लक्ष : आंदोलनाचा इशारा

Maalalwadi canals are dry for thirty-six years! | मासाळवाडी कालवा छत्तीस वर्षे कोरडाच!

मासाळवाडी कालवा छत्तीस वर्षे कोरडाच!

आटपाडी : मासाळवाडी (ता. आटपाडी) येथील शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून २ कि.मी. कालवा तयार केला आहे. मात्र पाटबंधारे विभागाच्या बेफिकीर कारभारामुळे गेली ३६ वर्षे या कालव्यातून अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही. तात्काळ पाणी सोडण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मासाळवाडीच्या सरपंच सौ. राणी मासाळ यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
१९७६ मध्ये मासाळवाडीतील शेतकऱ्यांनी आटपाडी तलावाचे पाणी शेतीला मिळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे मागणी केली होती. पाटबंधारे विभागाने तेव्हा अंदाजपत्रक तयार केले; पण पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. म्हणून मग शासनाच्या निधीची वाट न पाहता शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून बिरोबा मंदिर ते दार्इंगडे वस्तीपर्यंत कालव्याची खुदाई केली. तिथंपर्यंत आटपाडी तलावाच्या कालव्याचे पाणी येत आहे.
सध्या आटपाडी तलाव भरून पाणी ओढ्याने वाहून वाया जात आहे. पाणी वाया जाण्याऐवजी कालव्यात सोडून शेतीला देण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पाटबंधारे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास कालव्याचे आणखी काही काम करावे लागल्यास या विभागाच्या अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी लोकवर्गणी काढून कालव्याची खुदाई करण्याची तयारी शेतकऱ्यांनी दाखवली आहे. पाणी सोडल्यास १०० हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. याबाबत सरपंच सौ. मासाळ, भगवान दार्इंगडे, आत्माराम दार्इंगडे, महादेव मासाळ, बाळासाहेब मासाळ, अण्णा मेटकरी यांनी तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांना भेटून निवेदन दिले आहे. (वार्ताहर)..


लोकवर्गणीतून कालव्याचे काम
आटपाडी तलावाचे पाणी शेतीला मिळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे मागणी केली होती. पाटबंधारे विभागाने तेव्हा अंदाजपत्रक तयार केले; पण पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. म्हणून मग शासनाच्या निधीची वाट न पाहता शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून बिरोबा मंदिर ते दार्इंगडे वस्तीपर्यंत कालव्याची खुदाई केली.

Web Title: Maalalwadi canals are dry for thirty-six years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.