लकी ड्रॉच्या बहाण्याने सव्वाचार लाखांचा गंडा
By Admin | Updated: May 31, 2014 00:44 IST2014-05-31T00:43:52+5:302014-05-31T00:44:12+5:30
तासगावमधील प्रकार : अज्ञातावर गुन्हा

लकी ड्रॉच्या बहाण्याने सव्वाचार लाखांचा गंडा
तासगाव : ‘एअरटेल व कौन बनेगा करोडपती या दोन कंपन्यांच्या लकी ड्रॉमध्ये तुमच्या मोबाईल क्रमांकाचा समावेश झाला असून, २५ लाखांचे बक्षीस लागले आहे. त्याच्यावरील कराची रक्कम आधी भरावी लागेल,’ असे सांगून येथील तरुणाची ४ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार आज (शुक्रवारी) उघडकीस आला. याबाबत रवींद्र रामचंद्र माळी (वय ४०, रा. वरची गल्ली, तासगाव) यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दिली. विजयकुमार नामक एका अज्ञातावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. १० फेब्रुवारी ते १ मार्च २०१४ दरम्यान हा प्रकार घडला. फेब्रुवारीमध्ये विजयकुमार नामक एकाचा रवींद्र माळी यांच्या मोबाईलवर दूरध्वनी आला. लकी ड्रॉमधून तुम्हाला २५ लाखांचे बक्षीस लागले असून, ही रक्कम मिळविण्यासाठी अगोदर कर भरावा लागेल, असे त्याने सांगितले. विजयकुमारने आपण एअरटेल कंपनीत अधिकारी असल्याची बतावणीही केली. एअरटेल व कौन बनेगा करोडपती या दोन कंपन्या मिळून प्रत्येक महिन्याला लकी ड्रॉ काढत असून, त्यातच तुम्हाला लॉटरी लागल्याचे त्याने सांगितले. त्याच्या सांगण्यानुसार सुरुवातीला करापोटी १४ हजार ५०० रुपये आयसीआयसीआय बँकेत जॉय बॅनर्जीच्या खात्यावर माळी यांनी भरले. त्यानंतर विजयकुमारने कराची आणखी रक्कम भरावी लागेल म्हणून पैशाची मागणी सुरू केली. बक्षिसाची रक्कम मिळेल, या आशेने माळी यांनी १२, १३, १४, १५, १७, १८, २०, २१, २८ फेब्रुवारी व १ मार्च या तारखांना कधी १० हजार, कधी १५ हजार, कधी २५ हजार असे सुमारे ४ लाख २९ हजार रुपये भरले. ते करत असताना माळी यांनी नातलग, मित्रमंडळींकडून हातउसने पैसे घेतले आहेत. जॉय बॅनर्जी, प्रकाश तराजी, अशोक शहा, इंद्रजित मुखर्जी, एन. पांडे, सुुजॉय गोस्वामी अशा खातेदारांच्या खात्यावर माळी यांनी पैसे जमा केले आहेत. बक्षिसाची रक्कम केव्हा मिळणार हे विचारल्यावर, तुम्ही भरलेल्या पैशाचाही कर भरावा लागेल, असे विजयकुमारने सांगितले व आणखी कर भरा, पैसे पाठवतो, असे सुनावल्याचे फिर्यादीत नोंद आहे. (वार्ताहर)