काँग्रेसचा निष्ठावान नेता : उमाजी सनमडीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST2021-07-07T04:33:26+5:302021-07-07T04:33:26+5:30

उमाजी सनमडीकर यांनी दिवंगत नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यात काँग्रेस तळागाळात पोहोचवली होती. काँग्रेसचे निष्ठावान ...

Loyal Congress leader: Umaji Sanmadikar | काँग्रेसचा निष्ठावान नेता : उमाजी सनमडीकर

काँग्रेसचा निष्ठावान नेता : उमाजी सनमडीकर

उमाजी सनमडीकर यांनी दिवंगत नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यात काँग्रेस तळागाळात पोहोचवली होती. काँग्रेसचे निष्ठावान नेते अशी त्यांची ओळख होती. ते तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले.

सैन्यातून सेवानिवृत्त होताच त्यांना जत पंचायत समिती सदस्यपदाची संधी मिळाली होती. यानंतर श्रीमंत विजयसिंह राजे डफळे यांनी प्रथम १९८४ मध्ये त्यांना विधानसभा निवडणुकीत संधी दिली. तेव्हा ते चांगल्या मताधिक्याने निवडून आले. पुन्हा १९८९ मध्ये जतची जागा रिपाइंला सोडण्यात आली. त्यावेळी सनमडीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि निवडून आले. १९९४ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यानंतरही त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग ठेवला. पुन्हा काँग्रेसच्या चिन्हावर १९९९ ला ते विजयी झाले. यानंतर २००२ मध्ये महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या अध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्याचबरोबर त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जासुद्धा देण्यात आला होता.

त्यानंतर सनमडीकर यांचा राजकीय सहभाग कमी होत गेला असला तरी ते काँग्रेस पक्षात सक्रिय होते. पक्षाच्या कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेत असत. अलीकडे वयोमानानुसार व प्रकृतीच्या मानाने ते आपल्या सनमडी या गावी शेतातील घरातच राहत होते. म्हैसाळ सिंचन योजनेत पूर्वी जत तालुक्याचा समावेश नव्हता. त्यावेळी विधानसभेत आवाज उठवून त्यांनी म्हैसाळ योजनेत तालुक्याचा समावेश करायला लावला. त्यामुळे तालुक्यात त्यांना म्हैसाळ योजनेचे जनक म्हणून संबोधले जाते.

जत सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. कारखान्यात संस्थापक-संचालक म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी स्वतः सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ या नावाने शिक्षण संस्था स्थापन केली. तसेच उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन उभे केले. या दोन्ही संस्थांचे ते अध्यक्ष होते.

Web Title: Loyal Congress leader: Umaji Sanmadikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.