शामरावनगरमध्ये लसीकरणाला कमी प्रतिसाद; आतापर्यंत शहरात ७५ टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST2021-06-16T04:34:57+5:302021-06-16T04:34:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रात चार महिन्यात ७५ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सध्या ...

शामरावनगरमध्ये लसीकरणाला कमी प्रतिसाद; आतापर्यंत शहरात ७५ टक्के लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात चार महिन्यात ७५ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सध्या राज्यात कोल्हापूरनंतर सांगलीचा लसीकरणात दुसरा क्रमांक आहे. तरीही शहरातील शामरावनगर आरोग्य केंद्रावर सर्वात कमी लसीकरण झाले आहे. जामवाडी, हनुमाननगर, साखर कारखाना या आरोग्य केंद्रांवर मात्र लसीकरणाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
जानेवारी महिन्यापासून शहरात लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. पहिल्या दोन महिन्यात नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली होती. महापालिकेने या काळात पाच आरोग्य केंद्रात लसीकरणाची सोय केली. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत जागृती करीत होते. तरीही म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नव्हता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरूवात होताच लसीकरणाला गती आली.
पालिका क्षेत्रात ४५ वर्षांवरील १ लाख ४८ हजार नागरिक आहेत. त्यापैकी १ लाख १२ हजार नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर ३३ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. महापालिकेच्या दहा आरोग्य केंद्रांसह दोन शासकीय रुग्णालये व खासगी रुग्णालये अशी १९ केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू आहे.
चौकट
लसीकरण कमी होण्याचे कारण
दहा आरोग्य केंद्रांपैकी शामरावनगर केंद्रावर कमी लसीकरण झाले आहे. त्याखालोखाल मिरज अर्बन, द्वारकानगर केंद्राचा समावेश आहे. ही लसीकरण केंद्रे महिनाभर उशिरा सुरू झाली. त्यामुळे आकडेवारीत मागे पडल्याचे प्रशासनाचे मत आहे.
चौकट
आतापर्यंत ७५ टक्के लसीकरण
१. महापालिका क्षेत्रात ४५ वर्षांवरील ७५ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.
२. शहरातील हनुमानगर, जामवाडी, साखर कारखाना, अभयनगर, विश्रामबाग ही पाच लसीकरण केंद्रे सुरूवातीला सुरू झाल्याने या केंद्रावर सर्वाधिक लसीकरण झाले आहे.
३. उर्वरित पाच केंद्रे ही लसीकरणाला गर्दी वाढल्यानंतर सुरू करण्यात आली. तरीही समतानगर केंद्रावर ५ हजार ८०० जणांचे लसीकरण झाले आहे.
४. गेल्या महिनाभरापासून लसीचा पुरवठा अपेक्षित प्रमाणात झालेला नाही. त्यामुळे या मोहिमेला ब्रेक लागला आहे. सध्या सांगली जिल्हा लसीकरणात राज्यात दुसरा आहे.
चौकट
कोट
महापालिका क्षेत्रात लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लवकरात लवकर नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. आता १८ वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाची तयारी सुरू आहे. - नितीन कापडणीस, आयुक्त, महापालिका
चौकट
शहरात सर्वात जास्त लसीकरण झालेली केंद्रे
जामवाडी : ९,१९९
हनुमाननगर : ८,२१०
साखर कारखाना : ७,४९२
विश्रामबाग : ७,१७२
अभयनगर : ६,२३५
चौकट
शहरात सर्वात कमी लसीकरण झालेली केंद्रे
शामरावनगर : ४,६६८
मिरज अर्बन : ४,९२८
द्वारकानगर : ५,२९०
समतानगर : ५,८७०
इंदिरानगर : ५,६३१