राज्यात शिक्षणावर अत्यल्प खर्च दुर्दैवी
By Admin | Updated: October 25, 2015 23:30 IST2015-10-25T22:43:51+5:302015-10-25T23:30:37+5:30
पतंगराव कदम : पलूसकर शिक्षण संस्थेचा रौप्यमहोत्सव

राज्यात शिक्षणावर अत्यल्प खर्च दुर्दैवी
पलूस : महाराष्ट्रात शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विभागावर सर्वात कमी खर्च केला जातो, हे दुर्दैवी आहे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी व्यक्त केले. येथील पंडित विष्णू दिगंबर पलूसकर बहु. शिक्षण संस्थेचा रौप्यमहोत्सवी समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पतंगराव कदम बोलत होते. खासदार संजयकाका पाटील अध्यक्षस्थानी होते.
यावेळी आमदार जयंतराव पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार पृथ्वीराजबाबा देशमुख, ज्येष्ठ उद्योजक नानासाहेब चितळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
स्वागत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे यांनी केले. यावेळी शिक्षण संस्थेच्या २५ वर्षांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याच्या वाटचालीचा आढावा घेणारी ‘रौप्यमहोत्सवी भरारी स्मरणिका’ व महाराष्ट्रातील नामवंत शिक्षण तज्ज्ञांच्या लेखांचा समावेश असणारे ‘शिक्षणविचार’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
कदम पुढे म्हणाले, पलूसकर शिक्षण संस्थेने अल्पावधित गरूडभरारी घेतली आहे. आज रोजी या संस्थेच्या शिशु विकास मंदिर, माधवराव प्राथमिक विद्यामंदिर, माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर कॉलेज या सर्व शाखांतून दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक माजी विद्यार्थी देश-विदेशात विद्यालयाचे नाव गाजवत आहेत. या संस्थेच्या घडामोडी मी जवळून पाहिल्या आहेत. सध्याच्या काळात गुणवत्तेला पर्याय नाही. माणूस हाच शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. शिक्षणातून समाजपरिवर्तन करायचे आहे. परंतु महाराष्ट्रात सर्वात कमी खर्च शिक्षणावर होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जयंतराव पाटील म्हणाले, शाळा काढणे, चालविणे सोपे आहे, पण दर्जा टिकवून ठेवणे अवघड आहे. शाळा चांगली असेल तरच व्यक्तीची गुणवत्ता वाढते. नवनवीन शिक्षण पद्धती, संशोधनाचा जन्म युरोप, अमेरिकेत होतो; पण भारतात होत नाही, यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
उदय परांजपे यांनी राजकारणापासून दूर राहतही शिक्षण संस्था चांगली चालविली आहे. याचे विशेष कौतुकच वाटते, असे सांगितले. खासदार संजयकाका पाटील, माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.
भगवानराव साळुंखे, वसंतराव पुदाले, अमरसिंह इनामदार, आर. एम. पाटील, एस. के. पाटील, उपाध्यक्ष सुभाष सदामते, सचिव जयंतीलाल शहा, संचालक सुनील रावळ, विश्वास रावळ, विठ्ठल देवळे, संजय परांजपे, प्राजक्त परांजपे, वर्षा शहा, प्राचार्य सुहास निकम, एस. पी. मेंगाणे, अलका बागल, तानाजी करांडे, विकास गुरव, प्रा. बी. एन. पोतदार, ए. के. बामणे यावेळी उपस्थित होते.
सूत्रसंचालन धनंजय गाडगीळ यांनी केले, तर आभार संस्थेचे सचिव जयंतीलाल शहा यांनी मानले (वार्ताहर)
मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे नाराजी
शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे दोघेही मंत्री कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. यामुळे त्यांना विविध कामांसाठी भेटण्यास आलेल्या लोकांना नाराज होऊन परत जावे लागले. मंत्र्यांनी पाठ फिरविल्याने संयोजकांनीही नाराजी व्यक्त केली.