दंडोबा डोंगर व वनक्षेत्रात प्रेमीयुगुलांचे चाळे

By Admin | Updated: March 30, 2015 00:15 IST2015-03-29T23:34:23+5:302015-03-30T00:15:07+5:30

बंदोबस्ताची मागणी : वनअधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष; आगीच्या घटना वाढल्याने पर्यावरणाची हानी

Love lover in Dandoba mountain and forest area | दंडोबा डोंगर व वनक्षेत्रात प्रेमीयुगुलांचे चाळे

दंडोबा डोंगर व वनक्षेत्रात प्रेमीयुगुलांचे चाळे

अण्णा खोत : मालगाव  ::मिरज तालुक्यातील पर्यटनस्थळाकडे वाटचाल करणारे दंडोबा वनक्षेत्र असुरक्षित बनले आहे. देवदर्शनाच्या नावाखाली वनविभागात धुमाकूळ घालणाऱ्या प्रेमीयुगुलांमुळेच आगीच्या घटना घडत असल्याचे स्पष्ट होत असल्याने वनअधिकारी व कर्मचारी वनक्षेत्रात येणाऱ्या प्रेमीयुगुलांचा बंदोबस्त कधी करणार, असा सवाल वनप्रेमीतून विचारला जात आहे.  मिरज तालुक्यातील सिध्देवाडी, भोसे, मालगाव, खरशिंग, गुंडेवाडी या पाच गावच्या सीमेवर दंडोबा वनक्षेत्र विस्तारले आहे. लाखो रुपये खर्च करून मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली असली तरी, सध्या ही वनराई असुरक्षित बनली आहे. अलीकडे मिरज, सांगलीसह इतर शहरी भागातून देवदर्शनाच्या नावाखाली दिवसभर वनविभागात धुमाकूळ घालणारी जोडपीच धोक्याची ठरू लागली आहेत. गेल्या दोन महिन्यात दोन ते तीन वेळा वनविभागास आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. या आगीत अनेक वृक्षांचे नुकसान झाले आहे.
आगीच्या वाढत्या घटनांमुळे त्रस्त असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी आगीच्या कारणांचा शोध घेतला असता, प्रेमीयुगुलांमुळेच आगी लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुपारनंतर वनक्षेत्रात झाडाझुडपात बसून चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांकडून होणाऱ्या भोजनावळी, सिगारेट न विझवता टाकणे, गांज्यासारख्या अमली पदार्थांचेही सेवन होत असल्याने आगी लागण्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येत आहे.
वाढत्या आगीच्या घटना टाळण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रेमीयुगुलांचा बंदोबस्त करण्यासाठी कडक मोहीम राबवावी, अशी मागणी परिसरातील गावांमधून होत आहे.

वनक्षेत्रात लुटारूटोळीही सक्रिय
दंडोबा वनक्षेत्रात प्रेमीयुगुलांचा वावर वाढल्यामुळे तेथे छुपके-छुपके प्रेमाचा गैरफायदा घेण्यासाठी लुटारुंची टोळी सक्रिय झाली आहे. निर्जन ठिकाणी प्रेमीयुगुलांना गाठायचे आणि त्यांना प्रथम मारहाण करायची, लपून-छपून सुरू असणारा प्रेमग्रंथ उघड करण्याबरोबर जिवे मारण्याची धमकी देऊन दोघांच्या अंगावर असणारे सोने काढून घ्यायचे. प्रतिकार करणाऱ्या प्रेमीयुगुलास बेदम चोप देण्यापर्यंत टोळीची मजल गेली आहे. आतापर्यंत आठ ते दहा जोडप्यांना मारहाण व लुबाडणूक झाली आहे. मात्र प्रेमासाठी त्यांनी कोठेही वाच्यता केली नाही. लुटारू टोळीमुळे वनक्षेत्रातील निर्जन ठिकाणी अघटित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांनी वनक्षेत्रात चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांवर कारवाईची मोहीम हाती घेण्याची मागणी होत आहे.

Web Title: Love lover in Dandoba mountain and forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.