नुकसान तीनशे कोटी, मिळाले २0 कोटी

By Admin | Updated: March 30, 2015 00:18 IST2015-03-29T23:40:34+5:302015-03-30T00:18:02+5:30

८० लाख परत : गतवर्षातील स्थिती, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

Loss of three hundred crores, 20 crores received | नुकसान तीनशे कोटी, मिळाले २0 कोटी

नुकसान तीनशे कोटी, मिळाले २0 कोटी

सांगली : गतवर्षात अवकाळी पावसाने द्राक्षे, बेदाणा, डाळिंब बागांसह इतर पिकांचे तीनशे कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असताना, शासनाकडून १९ कोटी ९९ लाख ८५ हजारांचे वाटप करण्यात आले. यामधील ८० लाख रुपये परत गेले असून, याचा लाभ २३ हजार ८०० शेतकऱ्यांना झाला आहे.सांगली जिल्ह्यामध्ये २०१३-१४ मध्ये अतिवृष्टी व गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. पाच ते सहा वेळा झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. याचे वेळोवेळी प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले होते. पंचनामे केवळ नजरअंदाजाने करण्यात आले, प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे झाले नाहीत, अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या. राज्यात आघाडी सरकार होते. सांगली जिल्ह्यातील मंत्र्यांचा राज्य शासनामध्ये चांगला दबाव असल्यामुळे व त्याचबरोबर मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री डॉ. पतंगराव कदम सांगली जिल्ह्याचे असल्यामुळे अवकाळीग्रस्तांसाठी तात्काळ मदत जाहीर करण्यात आली. नुकसानीपोटी २१ कोटी ५१ लाख ३७ हजारांची मदत सांगली जिल्ह्याला वेळोवेळी प्राप्त झाली. यामधील या वर्षात १९ कोटी ९९ लाख ८५ हजारांचे प्रत्यक्षात वाटप करण्यात आले. यामधील ८० लाख रुपये विविध कारणांमुळे परत गेले. यामध्ये बँक खाते नसणे, लाभार्थी नसणे, नुकसान सिध्द झालेले नसणे आदी कारणे आहेत.
गतवर्षात महसूल व शेती विभागाकडून झालेले नुकसानीचे पंचनामे केवळ नजरअंदाजाने करण्यात आले, प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांनी शेतीला भेट दिली नाही, अशा अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. द्राक्षे, बेदाणा व डाळिंबासह रब्बी पिकांचे तीनशे कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबत शेतकरी संघटनांनी तशा भरपाईची मागणीही शासन व प्रशासनाकडे केली होती. मदतीचे वाटप टप्प्या-टप्प्याने झाल्याने या नुकसानीबाबत नंतर तक्रारी झाल्या नाहीत. (प्रतिनिधी)

तीन कोटी रुपये प्राप्त
२०१४ च्या डिसेंबर व नोव्हेंबर महिन्यात अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी तीन कोटी २७ मार्च रोजी प्रशासनाला प्राप्त झाले. या दोन महिन्यात सुमारे २० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी चार कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केले असून, त्यापैकी तीन कोटी रुपये आता प्राप्त झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम लवकरच जमा करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.

Web Title: Loss of three hundred crores, 20 crores received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.