नुकसान दोनशे कोटीवर, मागितले केवळ ५४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST2021-08-25T04:31:23+5:302021-08-25T04:31:23+5:30

सांगली : महापुरात मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यातील २४७ गावांतील ३९ हजार ६९५ क्षेत्रातील सोयाबीन, ज्वारी, मका, भात, ...

Loss on Rs 200 crore, only Rs 54 crore demanded | नुकसान दोनशे कोटीवर, मागितले केवळ ५४ कोटी

नुकसान दोनशे कोटीवर, मागितले केवळ ५४ कोटी

सांगली : महापुरात मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यातील २४७ गावांतील ३९ हजार ६९५ क्षेत्रातील सोयाबीन, ज्वारी, मका, भात, भाजीपाला आणि फळपिके जमीनदोस्त झाली आहेत. एक लाख १२०९ शेतकऱ्यांच्या शेतातील हातातोंडाला आलेली पिके वाया गेली. प्रशासनाने पंचनामे करून ५४ कोटींच्या निधीची शासनाकडे मागणी केली असली तरी प्रत्यक्षात हे नुकसान दोनशे कोटींवर असल्याचा अंदाज आहे.

जुलैत झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे पाच तालुक्यांतील २४७ गावांमधील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मिरज तालुक्यातील २६ गावे बाधित झाली असून, २१ हजार ५०३ शेतकऱ्यांचे नऊ हजार ३९८ हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. वाळवा तालुक्यातील ९८ गावांना पुराचा तडाखा बसला असून, ४३ हजार दोन शेतकऱ्यांचे १४ हजार ३१३ हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. शिराळा तालुक्यातील ९५ गावांतील २१ हजार ८९० शेतकऱ्यांचे चार हजार ७५८ हेक्टरचे नुकसान झाले असून, पंचनामेही पूर्ण आहेत. पलूस तालुक्यातील २६ गावांतील १३ हजार ५४१ शेतकऱ्यांचे सात हजार ९१८ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामेही पूर्ण केले आहेत. तासगाव तालुक्यातील दोन गावांमधील ७३ शेतकऱ्यांचे ३१.९२ हेक्टर नुकसानीचे पंचनामे पूर्ण आहेत. प्रशासनाने पंचनामे पूर्ण करून ३९ हजार ६९५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, तेथील शेतकऱ्यांना भरपाईसाठी शासनाकडे ५४ कोटी २८ लाख रुपयांची मागणी केली आहे.

प्रशासनाने पंचनामे करून तुटपुंज्या निधीची मागणी केली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे दोनशे कोटींहून अधिकचे नुकसान झाल्याचे पूरग्रस्त आणि कृषितज्ज्ञांचे मत आहे.

चौकट

पुरामुळे ४५५ हेक्टरवरील माती गेली वाहून

महापुरामुळे जमीन खरडून गेलेल्या १८१ गावांतील सहा हजार ३४२ शेतकऱ्यांच्या ४५५ हेक्टर क्षेत्रातील पिकांबरोबरच मातीही वाहून गेल्यामुळे ती जमीन नापिक झाली आहे. या शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

कोट

पंचनामे पूर्ण झाले असून, शासनाकडे निधीची मागणी केली आहे. शासनाकडून निधी मिळताच शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.

-मोसमी बर्डे, निवासी उपजिल्हाधिकारी, सांगली

चौकट

पुरामुळे पिकांचे नुकसान

तालुका शेतकरी क्षेत्र हेक्टरमध्ये अपेक्षित निधी

मिरज २१,९२३ १२,६७२.९१ १६.९० कोटी

वाळवा ४३,००२ १४,३१३.८६ १९.३६ कोटी

शिराळा २१,८९० ४५५८.१३ ३.६३ कोटी

पलूस १३,५४१ ७९१८.८७ १०.७९ कोटी

तासगाव ७३ ३१.९२ ३.२४ लाख

एकूण १०,१२०९ ३९,६९५.६९ ५४ कोटी २८ हजार

———————-

Web Title: Loss on Rs 200 crore, only Rs 54 crore demanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.