नजर ‘मटक्या’वर, निशाणा भाजपवर

By Admin | Updated: December 24, 2015 00:46 IST2015-12-23T23:57:39+5:302015-12-24T00:46:25+5:30

राष्ट्रवादीचे उद्या आंदोलन : मटका बंदची मागणी

Look at the 'Strike', Nishana to the BJP | नजर ‘मटक्या’वर, निशाणा भाजपवर

नजर ‘मटक्या’वर, निशाणा भाजपवर

दत्ता पाटील - तासगाव तालुक्यात काही महिन्यांपासून पुन्हा मटका सुरु झाला आहे. या मटक्याविरोधात राष्ट्रवादीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. अवैध धंदे बंद करावेत, मटक्यासारख्या धंद्यांना आश्रय देणाऱ्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी शुक्रवारी (ता. २५) आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे. राष्ट्रवादीची ही मागणी योग्य असली तरी, नजर ‘मटक्या’वर आणि राजकीय निशाणा ‘भाजप’वर असल्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री पदाच्या काळात तालुक्यातील मटका पूर्णपणे मोडीत निघाला होता. मात्र काही महिन्यांपासून तालुक्यात पुन्हा मटका व्यवसायाने जोर धरला आहे. तासगाव शहरातील अनेक चौकांसह, शहराबाहेर अनेक ठिकाणी मटक्याचे अड्डे सुरु आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मटक्याचे मोठे पेव आहे. हमाल, शेतमजुरांपासून ते अगदी श्रीमंत वर्गातील काही लोकही या मटक्याच्या आमिषाला बळी पडत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंंगळे यांनी तालुक्यातील मटक्याविरोधात स्वत:च मोहीम सुरु केली. पोलीस विभागालाही कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे तालुक्यात खुलेआम सुरु असणारा मटका बंद झाला. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी अड्डे सुरू करुन मटक्याची यंत्रणा राबवली जात आहे. मटक्याचे हे वास्तव असतानाच, या मटक्याला तालुक्यातील काही राजकीय नेतेमंडळींचा वरदहस्त असल्याची चर्चा होत आहे. तसा आरोप राष्ट्रवादीच्या आमदारांपासून अनेक नेतेमंडळींनीही केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनी, खासदार संजयकाकांच्या गावातच रोज एक लाख रुपयांचा मटका घेतला जात असल्याचा आरोप जाहीर सभेत केला होता. आमदार सुमनताई पाटील यांनीही तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातील मटका पूर्णपणे बंद व्हावा, अशी मागणी नागपूर येथील अधिवेशनात आंदोलनाच्या माध्यमातून केली होती. त्यामुळे तालुक्यातील मटक्याचा डंका तासगावपासून नागपूरपर्यंत पोहोचला.
राष्ट्रवादीने मटक्याविरोधात कंबर कसली असली तरी, ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’ या म्हणीप्रमाणे, निशाणा भाजपवर साधण्याचे काम केले जात आहे. मटका बंद व्हावा, या मागणीपेक्षा मटका व्यवसायाला आश्रय देणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी, अशीच मागणी करण्यात आली आहे. अवैध धंदेवाल्यांसोबत भाजपचे पितळ उघडे पाडण्यासाठीच पाठपुरावा केला जात असल्याची चर्चा आहे. आता राष्ट्रवादीचे कारभारी भाजपवर कशा पध्दतीने निशाणा साधतात, याची उत्सुकता आहे.
राष्ट्रवादीचे शुक्रवारी आंदोलन
तासगाव तालुक्यातील मटका पूर्णपणे बंद व्हावा, मटक्याला आश्रय देणाऱ्यांवर कारवाई करावी, यांसह अन्य मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादीच्या नेत्या स्मिता पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंंगळे यांना दिले आहे. या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षाचा राजकीय मटकाफोड करण्यासाठीची वाटचाल कशी असेल, हे पाहणेही औत्सुक्याचे आहे.

Web Title: Look at the 'Strike', Nishana to the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.