एकलकोंडेपणा, संवादातील दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST2021-09-06T04:29:40+5:302021-09-06T04:29:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढला आणि प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याला कलाटणी मिळाली. वर्ष सहा महिन्यात कोरोनाचे हे ...

Loneliness, communication gaps can worsen mental health! | एकलकोंडेपणा, संवादातील दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य!

एकलकोंडेपणा, संवादातील दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य!

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढला आणि प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याला कलाटणी मिळाली. वर्ष सहा महिन्यात कोरोनाचे हे संकट सरेल असे वाटत असतानाही गेल्या दीड वर्षापासून कोरोना आपल्या मानगुटीवर कायम आहे. याचमुळे सर्वसामान्य व्यवहारही बदलल्याने संवादाची दरी वाढतच चालली आहे. यातून एकलकोंडेपणा वाढत अनेकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्यामुळे संवाद वाढवा, मित्र, नातेवाईकांच्या संवादात राहा आणि निरोगी राहा असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.

शाळा, महाविद्यालये बंद असल्याने तरुणांना बाहेर पडता येत नाही. यामुळे घरातच असलेले अनेक जणांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्वत:ला एकटे ठेवण्यापेक्षा कोराेनाविषयक नियम पाळून संवाद वाढविणे हाच यावरील महत्त्वाचा उपाय आहे. सोशल मीडियावर इमोजीतून व्यक्त होण्याऐवजी प्रत्यक्ष संवादावर भर दिल्यास तणाव कमी होण्यास मदत होणार आहे.

चौकट

मन हलके करणे हाच उपाय

* घरात असताना, केवळ मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा कुटुंबातील इतर सदस्यांशी संवाद साधा, विविध विषयावर बोलत राहा.

* आपल्याला आवडीचे असलेल्या विषयावर चर्चा करा किंवा त्यातच अधिकवेळ आपला वेळ घालवा.

* हलके फुलके व ज्यातून कोणताही तणाव येणार नाही अशाच विषयावर चर्चा करा किंवा विचार करा.

* वेळ मिळाल्यानंतर मित्रांशी संवाद साधा, नातेवाईकांना आवर्जून कॉल करा.

चाैकट

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

मानवी संवाद हा कोणत्याही मानसिक ताणावरील प्रभावी उपाय आहे. त्यामुळे एकटे राहून वेळ घालविण्यापेक्षा संवाद साधत राहिल्यास एकटेपणाची सवय लागणार नाही आणि संवादातून मनही हलके होण्यास मदत होईल.

डॉ. चारुदत्त कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ

कोट

सोशल मीडियाचा वाढता वापर, मुलांमध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली वाढलेला मोबाईलचा वापर यामुळे संवाद कमी झाला आहे. यात पालकांची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी स्वत:हून आपल्या पाल्यांशी त्यांच्या आवडीच्या विषयावर संवाद साधून वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा.

पूनम गायकवाड, मानसोपचारतज्ज्ञ

Web Title: Loneliness, communication gaps can worsen mental health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.