लिंगीवरे ओढ्याचे नालाबांध निकामी
By Admin | Updated: October 14, 2014 23:25 IST2014-10-14T22:51:33+5:302014-10-14T23:25:54+5:30
दुरुस्तीच नाही : गळतीमुळे पाणी वाया

लिंगीवरे ओढ्याचे नालाबांध निकामी
लक्ष्मण खटके -- लिंगीवरे परिसरातील ओढ्याचे पाणी अडविण्यासाठी बांधण्यात आलेले नालाबांध निकामी झाल्यामुळे पावसाचे पाणी पूर्ण क्षमतेने अडले नाही. पाऊस पडला, पण गळतीमुळे पाणी वाहून चालले आहे.
लिंगीवरेच्या दक्षिणेला असणाऱ्या ओढ्यावर ठिकठिकाणी नालाबंडिंगची कामे करण्यात आली. पश्चिमेकडील मांगोबा शेतापासून लिंगीवरे हद्दीतील कोंडरापर्यंत सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरावर नालाबंडिंग बांधण्यात आले आहेत. सुमारे बारा नालाबांधांचे काम तीस वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून पहिली एक-दोन वर्षे फक्त या नालाबांधात पाणीसाठा झाला होता. परंतु त्यानंतर पाण्याबरोबर वाहून आलेला गाळ सर्वच नाल्यात साचून राहिला. त्यामुळे तेथील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत गेला.
पाण्याच्या दाबामुळे व प्रवाहामुळे सिमेंटच्या बांधाला आधार देणारे मातीचे बांध फुटले. काही सिमेंटचे नालाबांधही फुटले आहेत. त्यामुळे होणारा पाणीसाठा व पाण्याचा प्रवाह याच मार्गाने वाया जाऊ लागला. पाणी अडविण्यासाठी नालाबांधात अडथळा राहिलेला नसल्यामुळे मुरणेही बंद झाले आहे.
१९९८-९९ मध्ये कृषी विभागामार्फत या नाल्यांच्या दुरुस्तीस लोकसहभागातून नुकताच प्रारंभ झाला. नाल्यांमध्ये वाढलेली झाडे-झुडपे तोडण्याचे काम नावाला झाले. उपस्थितांनी गाळ गाढून पाणी अडविण्यासाठी फुटलेल्या बांधावर पाच पाट्या माती टाकली. या कार्यक्रमाचे सरकारी नियमाप्रमाणे औपचारिक उद्घाटन होऊन, आजअखेर १५ वर्षे परिस्थिती जैसे थे आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली असून, नवीन कामांवर लाखो रुपये खर्च केले गेले. त्याप्रमाणात त्याची उपयोगिता नालाबंडिंगच्या दुरुस्तीच्या कामापेक्षा कमीच आहे.
ओढ्याच्या पात्रात बाभळी जोमाने वाढत आहेत. मजुरांना रोजगार मिळावा यासाठी गाळ काढण्याची कामे सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन धडपडले. मात्र शासनाच्या धोरणामुळे गाळ काढण्याची योजना बारगळली. झाडे-झुडपे तशीच वाढली. यावर्षी पाऊस पडून या ओढ्याला पाणी आले. पण अशा परिस्थितीत पाणी वाहून गेले व पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला नाही.
मातीचे व सिमेंटचे बांधही फुटले
लिंगीवरे हद्दीतील कोंडरापर्यंत सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरावर नालाबंडिंग बांधण्यात आले आहेत. सुमारे बारा नालाबांधांचे काम तीस वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून, पहिली एक-दोन वर्षे फक्त या नालाबांधात पाणीसाठा झाला होता. पाण्याच्या दाबामुळे व प्रवाहामुळे सिमेंटच्या बांधाला आधार देणारे मातीचे बांध फुटले. तसेच काही सिमेंटचे नालाबांधही फुटले आहेत. त्यामुळे होणारा पाणीसाठा व पाण्याचा प्रवाह याच मार्गाने वाया जाऊ लागला आहे.