लॉकडाऊनने दिली निद्रानाशाची भेट; नैराश्य, भीती व रक्तदाबही वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:58+5:302021-02-05T07:31:58+5:30
सांगली : लॉकडाऊन काळातील शंभर टक्के संचारबंदीचा गंभीर फटका मनोरुग्णांनाही बसला. रुग्णालयात उपचार मिळणे दुरापास्त झाल्याने त्यांची मानसिक स्थिती ...

लॉकडाऊनने दिली निद्रानाशाची भेट; नैराश्य, भीती व रक्तदाबही वाढला
सांगली : लॉकडाऊन काळातील शंभर टक्के संचारबंदीचा गंभीर फटका मनोरुग्णांनाही बसला. रुग्णालयात उपचार मिळणे दुरापास्त झाल्याने त्यांची मानसिक स्थिती बिघडली. लॉकडाऊननंतर आता पुन्हा नव्याने त्यांना उपचारांच्या प्रक्रियेतून जावे लागत आहे.
लॉकडाऊनमध्ये मनोरुग्णांच्या वेदनांकडे सर्रास दुर्लक्ष झाल्याचे निरीक्षण आहे. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने रुग्ण घरीच कोंडले गेले. अैाषधोपचारांशिवाय त्यांना सांभाळण्याची जोखीम नातेवाईकांनाच पार पाडावी लागली. खासगी डॉक्टरांनी मोबाईलवरुन ऑनलाईन कन्सल्टींगचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न पुरेसा नव्हता. शासकीय स्तरावर रुग्णांच्या वैद्यकीय मदतीत अंतर पडू नये याचीही दक्षता घेतली गेली. काही मनोरुग्ण रत्नागिरीतील मनोरुग्णालयात जायचे. लॉकडाऊनमध्ये वाहतूक बंद असल्याने त्यांना जाता आले नाही. जिल्हा मानसोपचार अभियानाच्या अधिकाऱ्यांनी रत्नागिरीतील रुग्णालयाशी संपर्क साधून सांगली जिल्ह्यातील रुग्णांची माहिती घेतली. त्यांना संपर्क करुन सांगली शासकीय रुग्णालयात बोलवून घेतले. त्यांना उपचार दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव अत्युच्च स्तरावर असल्याच्या काळात म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मानसोपचार रुग्णालये बंद राहिली, त्याचाही त्रास रुग्णांना झाला. काही डॉक्टरांनी आठवडा-पंधरा दिवसांऐवजी महिना-दोन महिन्यांची अैाषधे एकत्रित दिली, रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा दिला.
चौकट
निद्रानाश, भीती, चिंतेने ग्रासले
लॉकडाऊननंतर निद्रानाशाचे रुग्ण वाढल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. कोरोनाच्या दणक्याने विकलांग झालेले शरीर, पहिल्या टप्प्यात समाजाकडून जणू वाळीत टाकण्याचे प्रकार, सोशल डिस्टन्सिंगसाठी कुटुंबीयांपासून पंधरा दिवस ते महिनाभर राखलेले अंतर याचा एकत्रित परिणाम रुग्णांवर झाला आहे. चिंताग्रस्त रुग्णांची गर्दी वाढली आहे. नैराश्य, भीती आणि त्यातून वाढलेला रक्तदाब असे चक्र सुरू झाले आहे. कोरोना काळात खुद्द काही डॉक्टरांनीही मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेतल्याची उदाहरणे समोर आली आहेत.
पॉईंटर्स
- जानेवारीत ११०० रुग्णांनी घेतले उपचार
- उपचार सुरू असणारे रुग्ण -१२५०
- सध्या भरती रुग्ण - ३५
- उपचार सुरू असणारे एकूण रुग्ण - १२८५
कोट
लॉकडाऊन काळात रुग्णालये काही काळ बंद राहिल्याने अशा रुग्णांना आम्ही स्वत:हून संपर्क केला. बाहेरगावी उपचारासाठी जाणे मुश्किल झाल्याने घरात अडकलेल्या रुग्णांनाही उपचार मिळवून दिले. सध्या लॉकडाऊननंतर दररोज चार-पाच रुग्ण येताहेत. १०४ या टोल फ्री क्रमांकावरही आमच्याशी रुग्ण संपर्क साधताहेत. निराशेच्या गर्तेत हरवू पाहणाऱ्या रुग्णांना उपचारांचा फायदा होत आहे.
- डॉ. गजानन साकेकर, जिल्हा मानसोपचार अभियान
-------------