लॉकडाऊनमध्ये दारूविक्रीही झाली ‘डाऊन’; दुकाने बंद असल्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:24 IST2021-05-22T04:24:22+5:302021-05-22T04:24:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांची मुदत वाढतच चालली आहे. बाधितांची ...

लॉकडाऊनमध्ये दारूविक्रीही झाली ‘डाऊन’; दुकाने बंद असल्याचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांची मुदत वाढतच चालली आहे. बाधितांची संख्याच आटोक्यात येत नसल्याने प्रशासनासमोर पर्यायही दिसत नाही. त्यात जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनला तीनवेळा मुदतवाढ दिली असल्याने अनेक व्यवसायांवर परिणाम झाला आहे. त्यात दरवर्षी वाढतच जाणाऱ्या दारूविक्रीला ब्रेक लागला असून, लॉकडाऊनमध्ये दारू विक्री घटली आहे. तरीही प्रशासनाने मार्चपर्यंत ३२२ कोटींचा महसूल संकलित केला आहे.
गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून केंद्राने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पहिल्यांदाच लॉकडाऊन लागू केल्यापासून सर्व व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यात शासनाला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या मद्यविक्रीला मर्यादा आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने दारूविक्रीवर निर्बंध आले आहेत.
लॉकडाऊनमध्ये दारूविक्री बंद असल्याने विक्रीवर परिणाम झाला आहे. घटणारा महसूल लक्षात घेऊन व दुकानदारांच्या मागणीप्रमाणे पार्सल सुविधा देण्यात येत होती. सध्या ही सुविधाही बंद असून, घरपोच सुविधा बंद असल्याने दारू दुकाने पूर्णपणे बंद आहेत. प्रशासनानेही या काळात गैरवापर टाळण्यासाठी सर्व दुकाने सील केली आहेत. त्यामुळे अवैध दारूविक्रीस लगाम बसला तरीही अनेकजण चाेरून विक्री करत असून, त्यांच्यावर पोलीस व राज्य उत्पादन शुल्ककडून कारवाई केली जात आहे.
चौकट
बिअरविक्री घटली, वाईनची विक्री वाढली
१) गेल्या वर्षीपेक्षा यंदा एप्रिलमध्ये दारूविक्रीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे.
२) त्यानुसार गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी बिअरविक्रीत घटत झाली आहे. यावर्षी एक लाख ७० हजार ६१६ लीटर विक्री झाली आहे. गेल्या संपूर्ण वर्षात १६ लाख ५५ हजार ४०२ लीटर बिअरची विक्री झाली होती.
३) यावर्षी वाईनच्या विक्रीत मात्र वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात ५७७६ लीटर वाईनची विक्री झालेली आहे. जी गेल्या वर्षीपेक्षा किंचित जास्त आहे.
चौकट
अवैध विक्रीवर कारवाई सुरूच
लॉकडाऊन कालावधीतही बेकायदेशीरपणे दारूविक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. एप्रिल महिन्यात ही कारवाई अधिकच तीव्र करून दंड करून त्यांच्यावर केसेस दाखल केल्या आहेत. त्यानुसार या एका महिन्यात ६६ केसेस करून १४ वाहने जप्त करून २२ लाख ३८ हजार २३० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
चौकट
महसुलास दारूचा आधार!
शासनाच्या तिजोरीत दारूविक्रीतून सर्वाधिक महसूल जमा होतो. कोविडच्या या वातावरणामुळे वर्षभरापासून अडचणी कायम असल्या तरीही सन २०२०-२१ मध्ये राज्य उत्पादन शुल्कच्या सांगली विभागाने ३२२ कोटींचा, तर गेल्या दीड महिन्यात १७ कोटींचा महसूल सरकारी तिजाेरीत जमा केला आहे.
कोट
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांची अंमलबजावणी करताना सर्व दुकाने बंद आहेत. तरीही प्रशासनाकडून अवैध विक्रीवर निर्बंध आणले आहेत. यापुढेही कारवाई सुरूच राहील.
संध्या देशमुख, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क