नागरी सहकारी बँकांच्या क्लस्टरमधून बहुजन तरुणांना कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST2021-08-14T04:31:42+5:302021-08-14T04:31:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांचे क्लस्टर बनविण्यात आले असून, त्याद्वारा बहुजन समाजातील तरुणांना उद्योग, ...

Loan distribution to Bahujan youth from clusters of civic co-operative banks | नागरी सहकारी बँकांच्या क्लस्टरमधून बहुजन तरुणांना कर्जवाटप

नागरी सहकारी बँकांच्या क्लस्टरमधून बहुजन तरुणांना कर्जवाटप

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगली जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांचे क्लस्टर बनविण्यात आले असून, त्याद्वारा बहुजन समाजातील तरुणांना उद्योग, व्यवसायासाठी अर्थसहाय्य करणार असल्याची माहिती कागल येथील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

सांगलीत शुक्रवारी नागरी सहकारी बँकांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे चर्चासत्र झाले, त्यानंतर पत्रकार बैठकीत ते बोलत होते. सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, जे. के. (बापू) जाधव, प्रा. शामराव पाटील, सुहास पुदाले आदी उपस्थित होते.

घाटगे म्हणाले, मराठ्यांसह बहुजन तरुणांना उद्योग आणि व्यवसायात स्वबळावर उभे करण्यासाठी सहकारी बँकांनी पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी बॅंकांचे क्लस्टर तयार केले आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळासह विविध माध्यमातून कर्जवाटप केले जाईल. सांगली जिल्ह्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाला वार्षिक २५०० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत २७९ प्रकरणे झाली आहेत. या प्रक्रियेतील त्रुटी दूर करून प्रकरणे वाढवली जातील. कर्जदार व महामंडळामध्ये समन्वयक म्हणून क्लस्टर काम करेल. तरुणांनी तसेच महिलांनीही कर्जे घेऊन उद्योजक व व्यावसायिक व्हावे, अशी अपेक्षा आहे.

घाटगे म्हणाले, सांगलीत १९ बँका क्लस्टरमध्ये सहभागी झाल्या आहेत, त्यातील चार बँकांनी महामंडळाशी करारदेखील केला आहे. विविध योजनांसाठी शासन अनुदान देते. या योजनेत सहकारी बँकांच्या समावेशासाठीही प्रयत्न करणार आहोत.

बैठकीला मंदाकिनी शिंदे, सुधीर जाधव, अलकादेवी पवार, महेश हिंगमिरे, बबन थोटे, चिंतामणी गुळवणी, धनंजय शहा, विजया बिजरगी, अशोक गायकवाड, ए. ए. मगदूम, किरण नायकवडी, उत्तम जाधव, दादासाहेब पाटील आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

चौकट

सहकार मंत्रालय फायद्याचेच

घाटगे म्हणाले, केंद्राने प्रथमच सहकार मंत्रालय तयार केले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राचा फायदा होईल. सहकार क्षेत्रातील त्रुटी दूर होतील.

Web Title: Loan distribution to Bahujan youth from clusters of civic co-operative banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.