रस्ता रुंदीकरणातील दीडशे झाडांना जीवदान

By Admin | Updated: August 13, 2014 23:35 IST2014-08-13T22:56:46+5:302014-08-13T23:35:34+5:30

हरित न्यायालयाचा आदेश : महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाला दणका

Lives of half a tree in road widening | रस्ता रुंदीकरणातील दीडशे झाडांना जीवदान

रस्ता रुंदीकरणातील दीडशे झाडांना जीवदान

सांगली : सांगली-मिरज रस्त्याच्या रुंदीकरणातील १८६ पैकी १२४ झाडे तोडण्याचा घाट महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाने घातला होता. पण राष्ट्रीय हरित न्यायालयाने केवळ ३७ झाडे तोडण्यास परवानगी देऊन, या रस्त्यावरील बेसुमार वृक्षतोडीला दणका दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सुमारे ३५० कोटींची नैसर्गिक मालमत्ता नष्ट होण्यापासून वाचली आहे, अशी माहिती समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, अजित ऊर्फ पापा पाटील, प्रा. आर. बी. शिंदे, रवींद्र चव्हाण यांनी आज (मंगळवारी) पत्रकार बैठकीत दिली.
ते म्हणाले की, सांगली-मिरज मार्गावरील पुष्पराज चौक ते विश्रामबाग या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हिरव्यागर्द झाडांनी अच्छादलेल्या या रस्त्यावर १८६ लहान-मोठी झाडे आहेत. रुंदीकरणासाठी १२४ झाडे तोडण्यास महापालिकेच्या वृक्ष समितीने मान्यता दिली होती. या रस्त्यावरील वृक्षतोडीला जिल्हा सुधार समितीने सुरुवातीपासून विरोध केला होता. समितीने वृक्षतोडीशिवाय रुंदीकरण प्रस्तावही दिला होता. पण त्या प्रस्तावाकडे कानाडोळा करून महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग वृक्षतोडीवर ठाम होते. याविरोधात समितीच्यावतीने अ‍ॅड. रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय हरित न्यायालयात याचिका दाखल केली होती. हरित न्यायालयाच्या पुणे खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. आर. किनगावकर, डॉ. अजय देशपांडे यांच्यासमोर याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेत बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता, महापालिका आयुक्त, ठेकेदार सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर यांना प्रतिवादी करण्यात आले होते.
सुनावणीवेळी बांधकाम विभागाने समितीची याचिका चुकीची असल्याचा बचाव केला होता. पण न्यायालयाने समितीने सुचविल्याप्रमाणे रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची सूचना दिली. त्यानंतर बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली. अखेर त्यांनी रुंदीकरणासाठी ३७ झाडे तोडण्याचा प्रस्ताव न्यायालयात सादर केला. याव्यतिरिक्त एकही झाड तोडणार नाही, असे प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. न्यायालयानेही हा प्रस्ताव मान्य केला. त्यामुळे या रस्त्यावरील १४९ झाडांना जीवदान मिळाले आहे. झाडे तोडण्यापूर्वी त्यांची यादी निश्चित केली जाणार असून, एका झाडापोटी त्याच जातीची पाच नवीन झाडे लावण्याचे आदेशही न्यायालयाने बांधकाम विभागाला दिले आहेत.
या निकालामुळे महापालिका आयुक्तांनी घाईगडबडीत दिलेली १२४ झाडे तोडण्याची परवानगी रद्दबातल ठरली असून, या लढ्याच्या विजयाचा आनंद वृक्षलागवड करून साजरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Lives of half a tree in road widening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.