साहित्यिक, साहित्य सुसंस्कृत, विवेकी असावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST2021-02-23T04:41:32+5:302021-02-23T04:41:32+5:30
विटा : आदर्श साहित्य घडविण्याची जबाबदारी नवोदित साहित्यिकांवर येऊन पडली आहे. प्रतिभावंतांचे चिंतन साहित्याची गुढी उंच उभारणारी असते. आपली ...

साहित्यिक, साहित्य सुसंस्कृत, विवेकी असावेत
विटा : आदर्श साहित्य घडविण्याची जबाबदारी नवोदित साहित्यिकांवर येऊन पडली आहे. प्रतिभावंतांचे चिंतन साहित्याची गुढी उंच उभारणारी असते. आपली माती, मातीत राबणारी माणसे व श्रमिक असे साहित्यांचे कितीतरी नवे विषय नवोदितांसमोर आहेत. त्याची निर्दोष मांडणी साहित्यातून झाली पाहिजे, असे सांगून साहित्यिक हा समाजसुधारक असतो. त्यामुळे साहित्यिक आणि साहित्य सभ्य, सुसंस्कृत आणि विवेकी असले पाहिजे, असे मत कवी इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले.
विटा येथे मुक्तांगण वाचनालय, भारतमाता ज्ञानपीठ व साहित्य सेवा मंडळाच्यावतीने आयोजित ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात कवी भालेराव अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी कवी संमेलनाध्यक्ष गोविंद काळे, सदगुरू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्णवर-पाटील, स्वागताध्यक्षा डॉ. चंदना लोखंडे, उद्योगपती कमलाकर बीडगर, रघुराज मेटकरी, अरुण लंगोटे उपस्थित होते.
इंद्रजित भालेराव यांनी मानवाचे दु:ख हलके करण्याचे काम कवितेने केले. जात्यावरच्या ओव्यातून ग्रामीण भागातील स्त्री स्वत:चे मन मोकळे करत राहिली. ओव्या अनेक काव्यप्रकारांनी भरलेल्या असल्याने ओव्या ही मराठी स्त्रीची अस्मिता आहे. नव कवींनी कविता ताकदीने लिहिली पाहिजे. कवितेचे चिंतन, मनन आणि लेखन झाले पाहिजे, असेही सांगितले. या साहित्य संमेलनावेळी ‘तराळ अंतराळ’ या स्मरणिकेचे आणि रघुराज मेटकरी यांच्या ‘स्वांतत्र्य लढ्यातील सुवर्ण रत्ने’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी योगेश्वर मेटकरी, प्राचार्या वैशाली कोळेकर, राजू गारोळे, अभिजित निरगुडे, तात्यासाहेब शेंडगे, तोसीम शिकलगार, शंकर कांबळे, चंदन तामखडे यांच्यासह साहित्यिक व नागरिक उपस्थित होते. डॉ. चंदना लोखंडे यांनी स्वागत केले. डॉ. ऋषिकेश मेटकरी यांनी प्रास्ताविक केले. अभिजित निरगुडे यांनी आभार मानले.