दुर्लक्षित स्मारकांच्या जागी मद्यपानाचे अड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:28 IST2021-08-23T04:28:18+5:302021-08-23T04:28:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली-मिरज रोडवरील क्रांतिबा जोतिबा फुले यांचे स्मारक, तसेच सांगली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम ...

दुर्लक्षित स्मारकांच्या जागी मद्यपानाचे अड्डे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली-मिरज रोडवरील क्रांतिबा जोतिबा फुले यांचे स्मारक, तसेच सांगली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम याची प्रचंड दुरवस्था व विटंबना सुरू आहे. सांडपाणी, कचरा, मातीचे ढिगारे यांचेच अस्तित्व दिसत असून ही दुर्लक्षित ठिकाणे आता मद्यपींचे अड्डे बनले आहेत, अशी तक्रार रिपब्लिकन स्टुडंट युनियनने महापालिकेकडे केली आहे.
संघटनेने दिलेल्या पत्रकात अमोल वेटम यांनी म्हटले आहे की, सांगली शहरातील आंबेडकर स्टेडियमची प्रचंड दुरवस्था आहे. पॅव्हेलियनची पडझड, समपातळी नसणे, आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी क्रीडांगणावर सोडणे, विद्युत व्यवस्थेअभावी अंधार अशा गोष्टींमुळे हे स्टेडियम दुर्लक्षित झाले आहे. त्यामुळे मद्यपींचा हा अड्डा बनलेला आहे. जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाजवळ असणाऱ्या या स्टेडियमची अनेक वर्षांपासून विटंबना सुरू आहे. स्टेडियमसमोरील गेटजवळ नो पार्किंगचा बोर्ड असूनही बेकायदेशीर दुचाकी व चारचाकी पार्किंग करण्यात येत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे व महापालिकेचे दुर्लक्ष आहे. स्टेडियमच्या विकासाबाबतचा १८ कोटींचा प्रस्ताव मंत्रालयात २०१७ पासून धूळ खात पडून आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात या स्टेडियमसाठी शून्य रुपयांची तरतूद करून कारभाऱ्यांनी जातीयवादी चेहरा उघड केलेला आहे. याचा आम्ही धिक्कार करतो, असे अमोल वेटम यांनी म्हटले आहे.