भरदिवसा साडेतीन लाखांची रोकड लंपास
By Admin | Updated: April 19, 2015 00:42 IST2015-04-19T00:42:27+5:302015-04-19T00:42:27+5:30
सांगलीतील घटना : खुजली पावडर टाकून ‘धूम’ टोळीचे कृत्य

भरदिवसा साडेतीन लाखांची रोकड लंपास
सांगली : मार्केट यार्डातील मका व्यापाऱ्याच्या गळ्यावर खुजली पावडर टाकून त्यांनी दुचाकीला अडकविलेली साडेतीन लाखांची रोकड असलेली बॅग हातोहात लंपास करून ‘धूम’ टोळीने पलायन केले. प्रभूदास अंबालाल त्रंबडीया (वय ५९, रा. शिवमॅजेस्टिक अपार्टमेंट, विश्रामबाग) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. जिल्हा परिषद ते राममंदिर कॉर्नर यादरम्यान शनिवारी दुपारी पावणेएक वाजता ही घटना घडली. याची विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद झाली.
प्रभूदास त्रंबडीया व्यवसायाच्या कामासाठी साडेतीन लाखांची रोकड काढण्यासाठी सकाळी अकरा वाजता पुष्पराज चौकातील एचडीएफसी बँकेत गेले होते. रोकड काढून ते साडेअकरा वाजता बँकेतून बाहेर पडले. रोकड त्यांनी रेक्झीनच्या बॅगेत ठेवली होती. ही बॅग त्यांनी दुचाकीच्या हॅण्डलला अडकविली. शहरात काम असल्याने ते राममंदिरच्यादिशेने येत होते. राममंदिरजवळ आल्यानंतर त्यांना मानेवर खाज सुटली होती. यामुळे दुचाकी थांबवून त्यांनी मानेवर खाजवायला सुरुवात केली. खाजविताना त्यांना हॅण्डलला रोकड असलेली पिशवी दिसली नाही. त्यांनी रस्त्यावर पडली आहे का, याची पाहणी केली. मात्र पिशवी नव्हती. त्यानंतर त्यांना चोरट्यांनी रोकड लांबविली असल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे प्रगटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे घटनास्थळी दाखल झाले होते.
चोरट्यांच्या शोधासाठी नाकाबंदी करण्यात आली होती. मात्र हाती काहीच लागले नाही. रात्री उशिरा त्रंबडीया यांनी फिर्याद दिली. बँक ग्राहकांना लूटणारी एक टोळी तासगावमध्ये जेरबंद केली असतानाच शहरात पुन्हा ही घटना घडली. सांगलीत होणाऱ्या घटनांमागे आणखी एक टोळी असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)