Likes lime, but say a Kingmaker! | लावतो चुना, पण किंगमेकर म्हणा!
लावतो चुना, पण किंगमेकर म्हणा!

ठळक मुद्देसावकरांनी कागदाचा बोळा करून फेकून दिला!पहिलं पान उघडलं आणि थंडगार एसीतही सदाभाऊंना घाम फुटला.

- श्रीनिवास नागे

इस्लामपूरजवळचं हिरवंगार फार्महाऊस. उन्हाची काहिली होत असतानाही इथं सगळं गारीगार. हायवेपासून पार आत असलेल्या फार्महाऊसपर्यंत आलेल्या गुळगुळीत रस्त्यावरून झुळकन् नवीकोरी इनोव्हा क्रिस्टा येते. सदाभाऊ उतरून आस्ते कदम (हो! आंदोलनं बंद केल्यापासून तरातरा चालण्याची सवय मोडलीय!) आत जातात. पाठोपाठ महिंद्राची एक्सयूव्ही येते. पोरगा सागरसोबत आणखी दोघं-तिघं. सगळे गुबगुबीत कोचवर विसावतात. एसी सुरू होतो.

सदाभाऊ हळूच टीपॉयवरच्या बाऊलमधला बदाम तोंडात टाकतात. चेहरा वैतागलेला. ‘आरं, त्या चंद्रकांतदादाला सांगा रे... हातकणंगलेची सीट मीच निवडून आणल्या म्हणूनशान फकस्त एकदा सगळ्यांम्होरं सांग म्हणावं. फकस्त एकदाच या सदाला क्रेडिट दे म्हणावं...’, सदाभाऊ बोलले. सगळे चिडीचूप. नुसत्याच माना हलवतात. ‘आरं, लै राबलूया. पर क्रेडिट आमाला न्हाईच! काय रे सागर, बोल की..’ सागर परत मान हलवतो.

तेवढ्यात एकजण मोबाईल सदाभाऊंपुढं धरतो. व्हॉटस्अ‍ॅपची पोस्ट दाखवतो. नवे खासदार धैर्यशील मानेंच्या फोटोमागं सदाभाऊंचा हसरा फोटो असतो. खाली लिहिलेलं असतं, ‘वाळव्यात लीड नाही. शिराळ्यात लीड नाही. यांच्या मरळनाथपुरात २५८चं लीड... आणि म्हणे हे किंगमेकर!’ सदाभाऊंचा चेहरा कसानुसा होतो. घशात कडवट गुळणी येते. गार पाण्याचा घोट घेऊन ते बोलू लागतात, ‘कुणी टाकलं म्हणायचं? मला बदनाम करत्यात. त्या दादांच्या मानसांचं काम असणार हाय...’ (पोरांना कळेना, नेमके दादा कोण? चंद्रकांतदादा की निशिकांतदादा?)
सदाभाऊ तळमळीनं बोलत होते, ‘पदरमोड करून प्रचार केलाय आमी. गाडी-घोडं, कार्यकर्त्यांचं खाणं-पिणं, स्पिकर-बिकर’ला काय पैसं लागत न्हाईत? त्येंनी काय दिलं? वरनं काय सुदीक आलं न्हाय. आमीच खिशातलं घातलं.’

‘मागच्या येळंला त्या माढ्यातबी काय मिळालं न्हाई. सगळ्यांना मुंबयमधनं खोकी आलती. पन आमी हुबा राहुनबी आमालाच काय न्हाई. का तर आमी तवा ‘स्वाभिमानी’कडनं लढत हुतो, म्हणून बीजेपीवाल्यांनी काय दिलं न्हाई. आता तर मिनिस्टर म्हणून काय न्हाई. सगळी रसद दादांच्या हातात!’... ही खरी मळमळ सदाभाऊंच्या मुखातून बाहेर पडत होती.

बाहेर गाडीचा आवाज आला. त्यातनं उतरून गणेश पळतच आला... ‘भाऊ... भाऊ, बगा काय मिळालंय... चंद्रकांतदादांची डायरी हाय. बालगावच्या मठात घावली. आणली उचलून. हिशेब हाय ह्यात इलेक्शनचा.’
सदाभाऊंचा चेहरा खुलला. ‘लावा रं फोन सगळ्यांना. घ्या बोलवून. सगळ्यांना कळंल, की सदाभाऊला किती मिळालं त्ये. त्या निशिकांतदादाला, महाडिकांच्या पोरांना, नायकवडींच्या गौरवला, शिंदेंच्या वैभवला, शिराळ्याच्या नाईकसाहेबांना फोन लावा. वारणेच्या सावकरांनाबी बोलवा.’

फटाफट फोन लावले गेले. पोटात कावळे ओरडत होते. नेर्ल्याच्या दत्त भुवनमधून मागवलेल्या मटण-भाकरीवर सगळ्यांनी आडवा हात मारला. तासाभरात बोलावलेली मंडळी आली. सदाभाऊंनी सगळ्यांना कोचावर बसवलं. सरबत दिलं आणि डायरी दाखवली... ‘बघा. ही डायरी चंद्रकांतदादांची हाय. इलेक्शनचा सगळा हिशोब हाय त्यात. आमाला दादांनी काय सुदीक दिलं नव्हतं. खिशाला खार लागला आमच्या. आता वाचूयाच... कुनाला काय दिलं त्ये.’
पहिलं पान उघडलं आणि थंडगार एसीतही सदाभाऊंना घाम फुटला. त्यांनी टर्रकन् पान फाडलं. डस्टबीनमध्ये टाकलं. ‘जाऊ दे मंडळी. नंतर बोलू... जेवा आता. मी जर जाऊन येतो,’ म्हणून डायरी बंद केली. ते गेले. वारणेच्या सावकरांनी हळून डस्टबीनमधनं कागद उचलला.
त्यावर तारीख होती १० एप्रिल.

लिहिलं होतं, ‘आज सगळ्यांना पोहोच केलं. शेवटून पाचव्या पानावर रकमा लिहिल्या आहेत. सदाभाऊ सगळ्यांना चुना लावतात म्हणून मी त्यांना काहीच दिलं नाही. पण ‘सीएम’कडून त्यांना दोन खोकी पोहोच झाल्याचं समजलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सदाभाऊंना बंडल दिलं, पण लगेच कोल्हापुरात जाऊन त्यांनी कपडे, चप्पल आणि घरासाठी पडदे खरेदी केले होते...’
सावकरांनी कागदाचा बोळा करून फेकून दिला!


Web Title: Likes lime, but say a Kingmaker!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.